'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:55 IST2026-01-10T20:53:56+5:302026-01-10T20:55:31+5:30
Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे.

'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
एकीकडे मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या महानगपालिकांमध्ये भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढत आहेत, तर दुसरीकडे शिंदेसेना आणि भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये प्रचारादरम्यान, तुफान वाकयुद्ध रंगलेलं दिसत आहे. भविष्यकाळात यांची जागा तुरुंगात असेल, असा दावा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केला होता. तसेच माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशाराही गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत असलेल्या गणेश नाईक यांच्यावर टीका करताना शिंदेसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्ङणाले की, गणेश नाईक यांना नवी मुंबईमधील पराभव दिसून लागला आहे. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारतेय. हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. मी नाईक जनता पार्टीच्या नेत्यांना सल्ला देतो की, त्यांना लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावं. त्यांची योग्य ती तपासणी करावी. त्यांची मनस्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीची विधाने करताहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदेसेनेसोबत झालेल्या युतीबाबत मोठा दावा करताना गणेश नाईक म्हणाले होते की, "भाजपाचे केंद्रीय नेतृत्व दिलेल्या शब्दाला जागणारं नेतृत्व आहे. म्हणून आता आपली गरज संपल्यानंतरही घटक पक्षांना बाजुला करू नये, या अतिशय चांगुलपणाच्या भावनेपोटी केंद्रीय नेतृत्वाने या गोष्टी करण्यास मनाई केली आणि परिणामी काही ठिकाणी युती झाली. मात्र मी आज सांगतो २०२९ मध्ये मतदार पुनर्रचना होईल ना, त्यावेळी सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील. होत्याचं नाहीसं होऊन जाईल. जनतेला माहिती आहे की प्राबल्य कुठून आणि कसं आलं? मी बोललो पैसा कमवा, पण तो कुठल्या मार्गाने आला, तो मार्ग जनसामान्यांना पटवून द्या, असा टोलाही नाईक यांनी लगावला होता.