उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:16 IST2024-05-14T13:15:31+5:302024-05-14T13:16:09+5:30
ठाणे लोकसभा मतदार संघ वर भाजपाने यंदा दावा ठोकल्याने महायुतीत ह्या मतदारसंघाचे वाटप लांबणीवर पडले होते . भाजपा कडून दावा करताना भाजपाचे चार आमदार असल्याचा मुद्दा देखील पुढे केला गेला होता .

उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलले
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी मीरारोड येथे आयोजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलण्यात आले आहे . माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या सभेच्या पोस्ट मध्ये आ . जैन यांना स्थानच दिलेले नाही .
शिंदेसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही पासून शिंदेसेनेने आमचे वर्चस्व दाबण्याचे , वारंवार व व्यावसायिक त्रास देण्याचे आणि तोडफोडीचे राजकारण केल्याचा आरोप मीरा भाईंदर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी केला होता . परंतु नंतर मात्र मेहतांनी भूमिका बदलत शिंदेसने समोर नमते घेत नरेश म्हस्के यांचा प्रचार सुरु केला.
ठाणे लोकसभा मतदार संघ वर भाजपाने यंदा दावा ठोकल्याने महायुतीत ह्या मतदारसंघाचे वाटप लांबणीवर पडले होते . भाजपा कडून दावा करताना भाजपाचे चार आमदार असल्याचा मुद्दा देखील पुढे केला गेला होता . त्यात मेहतांचा पराभव करून निवडून आलेल्या आ . गीता जैन यांचा देखील समावेश होता . ठाणे येथील भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीला सुद्धा आ . जैन यांना बोलावण्यात आले होते .
एकीकडे भाजपा आणि आ. जैन ह्या एकमेकांचे असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे १४ मे रोजी सायंकाळी मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात होणाऱ्या जाहीर सभेच्या निमंत्रण जाहिरातीत मेहतांनी व शर्मा यांनी आ . जैन यांना डावलले आहे. मेहतांच्या समाज माध्यमावरील जाहिरातीत आ . गीता जैन यांचे नाव वा छायाचित्रच नाही . सदर पोस्ट मेहता समर्थकांनी देखील शेअर केल्या आहेत .
सदर सभा ही मेहतांच्या शाळेच्या मैदानात होत आहे. जैन यांनी मेहतांचा दारुण पराभव केल्या पासून दोघां मधील वाद वाढला असल्याचे अनेकदा पहायला मिळाले. पण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा संकल्प सोडताना व्यक्तिगत मतभेद मात्र कायम ठेवल्याने भाजपातील ह्या अंतर्गत गटबाजीचा फटका शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे .