अर्ज भरण्यासाठी आता उरले अवघे काही तास; एबी फॉर्म मिळेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:44 IST2025-12-30T08:44:48+5:302025-12-30T08:44:48+5:30
प्रशासनाचीही लागेल कसोटी: भाजप, शिंदेसेनेच्या उमेदवारांनी सोमवारी एबी फॉर्मविना भरले अर्ज

अर्ज भरण्यासाठी आता उरले अवघे काही तास; एबी फॉर्म मिळेल का?
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड: भाजप आणि शिंदेसेनेत बंडखोरीची शक्यता पाहता दोन्ही पक्षांकडून मंगळवारी शेवटच्या दिवशीच उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले जाणार आहे. एबी फॉर्म तेव्हाच देणार असले तरी काहींनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवारी मिळालेले आणि न मिळालेलेदेखील शेवटच्या दिवशी अर्ज भरणार असल्याने मोठी गर्दी होणार आहे. परिणामी निवडणूक यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली असून बंडखोरी टाळण्यासाठी त्यांनी अजूनही अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.
नगरसेवक पदांसाठी सोमवारी ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर २४७ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. यापूर्वीचे दाखल झालेले अर्ज मिळून आतापर्यंत मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीसाठी ६५ अर्ज दाखल झाले आहेत. ८ लाख १९ हजार १५१ मतदार आहेत.
बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी अर्ज
पक्षाचे एबी फॉर्म दिलेले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी मंगळवारी उमेदवारी निश्चित झालेल्यांना अर्ज भरण्यास सांगितले जाईल. तसेच, सोबत एबी फॉर्म देणार की नंतर पक्षाच्या माध्यमातून एबी फॉर्म सादर केला जाणार, अशी शक्यतासुद्धा आहे. ज्यांचा पत्ता कापला जाणार आहे, त्यांनादेखील पक्ष कार्यालयात बोलावून बोलण्यात गुंतवून अडकवून ठेवले जाण्याचा प्रयोगदेखील होऊ शकतो. जेणेकरून बंडखोरांना गाफील वा उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखता येईल.
भाजपच्या नऊ जणांनी भरले उमेदवारी अर्ज
सोमवारी भाजपचे इच्छुक असलेल्या संजय दोंदे, जयेश भोईर, वंदना पाटील, राकेश शाह, श्रीप्रकाश सिंग, आकांक्षा वीरकर, आनंद मांजरेकर, प्रशांत दळवी आदी ९ जणांनी उमेदवारी आज भरले आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने अर्ज भरण्यास सांगितले की, न सांगताच परस्पर अर्ज भरले, अशी चर्चा भाजपमधील अन्य इच्छुक उमेदवारांमध्ये रंगली आहे.
काँग्रेस-उद्धवसेनेत बेबनाव ?
काँग्रेसने एबी फॉर्म दिले असून रौफ आणि झीनत कुरेशी यांनी प्रभाग ८ मधून; तर प्रभाग २१ मधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंतसह रूपा पिंटो, अजय सिंग, हेमांगी पाटील यांनी अर्ज भरले.उद्धवसेनेच्या नीलम ढवण, शिवकुमार जैन, राजू विश्वकर्मा व ज्योती शेवंते यांनी प्रभाग ३ मधून अर्ज भरले. येथून काँग्रेसच्या अजितकुमार गुप्ता यांनीसुद्धा अर्ज भरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत बेबनाव समोर आला आहे.
शिंदेसेनेचे नाराज मोझेस चिनप्पा गेले दुसऱ्या पक्षात
शिंदेसेनेच्या महेश शिंदे, निशा सिंग, पल्लवी म्हात्रे व अॅड. श्याम शहारे या चौघांनी प्रभाग १३मधून अर्ज भरले आहेत. त्यामुळे प्रभाग १३ मधील नाराज मोझेस चिनप्पा यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. भाजपचे सोमनाथ पवार यांनी प्रभाग १६ मधून उद्धवसेनेचा अर्ज भरला आहे. मनसेचे सचिन पोपळे यांनी प्रभाग १८ व अभिनंदन चव्हाण यांनी प्रभाग २३ मधून अर्ज भरला.