माजी नगरसेवकांसह आश्वासने दिलेल्यांचे भाजपाने कापले पत्ते; नाराजांनी केले बंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:04 IST2026-01-02T11:04:56+5:302026-01-02T11:04:56+5:30
अर्ज माघारी न घेता निवडणूक लढवण्यावर अनेक जण ठाम

माजी नगरसेवकांसह आश्वासने दिलेल्यांचे भाजपाने कापले पत्ते; नाराजांनी केले बंड
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने ३० नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व आश्वासन दिलेल्यांचे पत्ते कापल्याने मोठी नाराजी उफाळून आली आणि सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये झाली. अन्य पक्षातील नगरसेवक जे तिकिटाच्या आशेने भाजपमध्ये आले होते अशांनाही उमेदवारी न दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. या सर्वांची मनधरणी करण्याचे प्रयत्न बुधवारपासून सुरू आहेत, मात्र यापैकी अनेकांनी मनधरणीकरिता आलेल्यांकडेही आपली नाराजी व्यक्त करत आपण उमेदवारी लढविण्यावरच ठाम भूमिका घेतली.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत २०१७साली भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, विनोद म्हात्रे, रिटा शाह, दीपाली मोकाशी, डॉ. सुशील अग्रवाल, वैशाली रकवि, सुनीता भोईर, रोहिदास पाटील, मीना कांगणे, गणेश भोईर, प्रभात पाटील, मेघना रावल, डॉ. राजेंद्र जैन, रक्षा भुपतानी, मॉरस रॉड्रिक्स, प्रीती पाटील, अरविंद शेट्टी, वीणा भोईर, विविता नाईक, दौलत गजरे, अनिता मुखर्जी, विजयकुमार राय, सुजाता पारधी, सचिन म्हात्रे तर स्वीकृत असलेले अनिल भोसले व अजित पाटील तसेच काँग्रेस मधून आलेले नरेश पाटील, सारा अक्रम व अमजद शेख यांना भाजपाने यंदा उमेदवारी नाकारली.
तिकीटासाठी काँग्रेसमधून आले पण तिकीट नाकारले
यातील चंद्रकांत वैती यांच्या भावजय विजया वैती, सचिन म्हात्रे यांचे पत्नी मयुरी, अजित पाटील यांच्या सून आभा, सुजाता पारधी यांचे नातलग तुषार यांना उमेदवारी देऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केलेत.
काँग्रेसमधून निवडून येऊन भाजपसोबत गेलेले पाटील, सारा व अमजद यांना भाजपकडून उमेदवारी न दिल्याने आणि ते ज्या प्रभागातून निवडून आले तिकडे काँग्रेसची ताकद अधिक असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यातूनच पाटील व अमजद यांना राष्ट्रवादी (अजित पवार) मधून उभे राहण्याची पाळी आली आहे.
अनेकांना अपक्ष म्हणून भरावे लागले अर्ज
भाजपचे तिकीट मिळेल म्हणून विश्वास बाळगून असलेले माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया, शरद पाटील, नर्मदा वैती आदींना देखील उमेदवारी दिलीच नाही. यातील काहींना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. मात्र काहींना विलंब झाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
मध्यरात्री २ वाजेपर्यंत मला ताटकळत ठेवले. निष्ठावंत राहून काम केले आहे. अन्य पक्षातून मला कॉल आले होते, मात्र त्यांना मी प्रतिसाद दिला नाही. भूमिपुत्रांना तर गणतीत घेतले नाही. आगरी कोळ्यांना बाद केले आहे. आपण अजिबात माघार घेणार नाही. - प्रीती पाटील, माजी नगरसेविका.