"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:08 IST2026-01-05T18:07:39+5:302026-01-05T18:08:47+5:30
तुमच्यात हिंमत असेल तर मला नडून दाखवा असं आव्हान नरेंद्र पवारांनी शिंदेसेनेला दिले. कुणीही घाबरायचे नाही. आपल्यामागे नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
उल्हासनगर - राज्यात सत्ताधारी महायुतीतील भाजपा शिंदेसेना मुंबई, ठाण्यात युती म्हणून निवडणूक लढवत असले तरी काही महापालिकांमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे. याच महापालिकांमधील एक उल्हासनगर येथे भाजपाच्या माजी आमदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले आणि आता उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करू असं आव्हानच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिंदे पिता पुत्राला दिले आहे.
भाजपा उमेदवाराच्या प्रचारात माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये भाजपाची सत्ता आली. तिथून आम्ही तुम्हाला हाकलून दिले आहे. बदलापूरपासून सुरुवात झाली आहे तिथे धनुष्यबाणाचा सुपडासाफ झाला आहे. अंबरनाथमधील लोकांनीही या दोघांना हाकलून दिले. दादागिरी केली, गुंडगिरी केली पण तुमच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत. मोठमोठ्यांची दादागिरी हाणून पाडली तुम किस खेत की मूली हो...तुमची दादागिरी मला माहिती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मला नडून दाखवा असं आव्हान त्यांनी शिंदेसेनेला दिले. कुणीही घाबरायचे नाही. आपल्यामागे नरेंद्र मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
शिंदेसेनेचा भाजपावर पलटवार
तर तुमच्यात हिंमत असेल तर या शिवसेनेचा धनुष्यबाण उल्हासनगर आणि महाराष्ट्रातून सुपडासाफ करून दाखवाच, आमचे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ही जी मुक्ताफळे तुम्ही उधळली आहेत. ही खुमखुमी तुमच्यात आलीय, त्याबद्दल तुमच्या बापाला जाऊन विचारा हे योग्य आहे की अयोग्य आहे, जर त्यांनी तुम्हाला मान्यता दिली तर यापुढे असे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर काढा. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या वाघ आणि वाघाच्या बछड्यावर बोलताना १०० वेळा विचार करावा लागेल. शिवसेनेला संपवणे तुम्हालाच काय पण तुमच्या १० जन्मातही हे शक्य होणार नाही असा पलटवार शिंदेसेनेचे प्रवक्ते अरूण सावंत यांनी केला आहे.