मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:33 AM2024-03-30T05:33:54+5:302024-03-30T06:56:33+5:30

कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली. मात्र, ही भेट राज्यातील शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात होती, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली.

In the Chief Minister Eknath Shinde Thane, but at an unknown place...!; Ministers and MLAs also did not meet | मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट

मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट

ठाणे : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा महायुतीमधील तिढा अद्याप सुटलेला नसून याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र, मुख्यमंत्री हे ठाण्यातील अज्ञातस्थळी असल्याने त्यांची या मंत्री, आमदारांसोबत भेट होऊ शकली नाही. कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली. मात्र, ही भेट राज्यातील शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात होती, अशी माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली.

शुक्रवारी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञातस्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार- खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ताटकळत बसावे लागले.

उदय सामंत, किरण सामंत, सुहास कांदे यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली.  या भेटीनंतर म्हस्के म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तिथे प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बैठक होती, तसेच ज्या जागा शिंदे गटाच्या हक्काच्या आहेत, त्या मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर महायुतीचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील. नाशिक लोकसभेची जागा पारंपरिक शिंदे गटाची आहे. 

आमचा आमच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आ. कांदे यांनी दिली. किरण सामंत यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री  दिवसभर ठाण्यात असूनही ठाण्यातील निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणे त्यांनी टाळले. शिंदे यांनी मंत्र्यांची भेट घेणे का टाळले, याचे कारण गुलदस्त्यात आहे. 

Web Title: In the Chief Minister Eknath Shinde Thane, but at an unknown place...!; Ministers and MLAs also did not meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.