"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:40 IST2026-01-06T20:39:22+5:302026-01-06T20:40:29+5:30
केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथमध्ये पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती सत्तेपोटी मोडली असा आरोप शिंदेसेनेचे आमदार किणीकर यांनी केला.

"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
अंबरनाथ - राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेत भाजपाने मोठी खेळी खेळली आहे. भाजपाच्या या डावपेचामुळे शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. अंबरनाथमध्ये भाजपाने काँग्रेसची साथ घेत सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला मोठा झटका बसला आहे. भाजपाच्या या खेळीने दुखावलेले शिंदेसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी महापालिका निवडणुकीत याचे परिणाम पाहायला मिळतील असा इशारा भाजपाला दिला आहे.
शिंदेसेनेचे आमदार बालाजी किणीकर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायती निवडणुका महायुतीने मैत्रीपूर्ण लढतीत लढल्या. त्यात सर्वात जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक महायुतीचे आले. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले पण नगराध्यक्ष भाजपाचा निवडून आला. त्यांचेही आम्ही स्वागत केले. परंतु पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती असताना अंबरनाथमध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जो पक्ष हिंदुत्वविरोधी आहे अशा काँग्रेससोबत अभद्र युती केली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यात वेगळा संदेश भाजपाने दिला असं आम्हाला वाटते असा आरोप त्यांनी केला.
तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही स्थानिक पातळीवर भाजपाशी चर्चा केली. त्यानंतर स्वत: नगराध्यक्ष यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यांनीही नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. युतीची बोलणी सुरू असताना त्यांनी अचानक हे केले. निवडणुकीआधी आम्ही युतीची बोलणी केली होती परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. त्यानंतर युती तुटली. अंबरनाथ नगरपालिकेत कुणावर टीकाटिप्पणी न करता आम्ही लढलो. याठिकाणी नगराध्यक्षपदी आमचा उमेदवार पराभूत झाला तरी सर्वाधिक नगरसेवक आमच्या पक्षाचे आहेत असं बालाजी किणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथमध्ये पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती सत्तेपोटी मोडली. जो हिंदुविरोधी पक्ष आहे त्या काँग्रेससोबत युती करून आमच्यासोबत युती तोडली आहे. हा वेगळा पायंडा भाजपाने याठिकाणी पाडला. हा चुकीचा संदेश अंबरनाथमधून गेला आहे. याचे परिणाम राज्यभरात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. भाजपाने काँग्रेससोबत युती करून जो पारंपारिक युतीचा धर्म आहे तो पाळला नाही. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जे हिंदू मतदार आहेत, जे काँग्रेस विरोधी आहेत त्यांचा परिणाम या महापालिका निवडणुकीत होईल असा इशारा आमदार बालाजी किणीकर यांनी दिला.