दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:47 IST2025-12-26T06:47:09+5:302025-12-26T06:47:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ ठाण्यातही राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष एकत्र येण्याची ...

दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ ठाण्यातही राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. आ. जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नाहीत. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी विचार करावा, असे सूचक विधान राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी गुरुवारी केले.
ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये शिंदेसेना व भाजपने युतीचा मनसुबा जाहीर केला आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला साध्या चर्चेसाठी निमंत्रण दिलेले नव्हते. त्यामुळे अजित पवार गटाने स्वबळाचा नारा दिला. त्यांचे लक्ष ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा या भागांवरच राहणार आहे. किंबहुना त्यांची लढत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाबरोबरच होणार आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाण्यात वर्चस्व आहे; परंतु ठाकरे बंधूंनी ‘आम्ही सांगतो त्याच जागा तुम्हाला मिळतील’, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हा शरद पवार गट नाराज झाला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष मुल्ला यांनी ३० तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो श्रेष्ठींकडे पाठविणार आहोत. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी (अजित पवार) गट आमचे दुश्मन नाहीत; परंतु याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. निवडणुकीआधी एकत्र यायचे की नंतर, हे पाहिले जाईल. मात्र निवडणुकीपूर्वी एकत्र आलो तर पक्षाची ताकद दिसेल.
मनोज प्रधान,
अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार), ठाणे