काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

By अनिकेत घमंडी | Published: April 3, 2024 01:08 PM2024-04-03T13:08:35+5:302024-04-03T13:08:39+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारसंघ गमावून बसणार आहे.

Both groups of uncle and nephew are out of the fray from Thane, Kalyan before the election | काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - ठाणेकल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी प्रत्येकवेळी शिवसेनेला अंगावर घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात दोन्ही गट ठाणे, कल्याण मतदारसंघ गमावून बसणार आहे. ठाणे व कल्याणमधील लढाई ही शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

नव्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविता येणार नसल्याने शरद पवार गट व अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ आहेत. भविष्यातही शिंदे व ठाकरे गटातच राजकीय संघर्ष होणार असेल तर आपले राजकीय भवितव्य काय, हा पेच त्यांच्यासमोर उभा आहे. कल्याण लोकसभेतून २००९ मध्ये आणि त्या आधीही दिवंगत नेते वसंत डावखरे, २०१४ मध्ये आनंद परांजपे, २०१९ मध्ये ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मुळात हा युतीचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसचा निभाव लागला नाही. तिन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा लाखोंच्या मताधिक्याने पराभव झाला होता. शिवसेनेत असताना एकदा परांजपे आणि दोन वेळा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गेलेल्या आनंद परांजपे यांना या दोन्ही मतदारसंघात आता निवडणूक लढविता येणार नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात शिंदे सेना व भाजपचे आमदार आहेत. 

कोणत्या गटात कोण आले?
राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटात आ. जितेंद्र आव्हाड, वंडार पाटील, सुधीर पाटील हे प्रमुख नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आनंद परांजपे, अप्पा शिंदे, प्रमोद हिंदुराव हे प्रमुख नेते आहेत. माजी आमदार पप्पू कलानी कोणत्या गटात आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Both groups of uncle and nephew are out of the fray from Thane, Kalyan before the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.