'राम सिया के लव कुश' ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री शिव्या पठानिया साकारणार आहे. या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...

- तेजल गावडे

तुझ्या अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांग?
मी शिमलाची असून इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण केलं आहे. माझ्या कारकीर्दीला सुरूवात २०१३ साली मिस शिमलाचा किताब जिंकून झाली. त्यानंतर मी एक ऑडिशन दिलं ज्याच्यासाठी मी मुंबईत आले. आता मला मुंबईत येऊन चार -पाच वर्षे झाली आहेत. मी 'हमसफर्स' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत मी एका मुस्लीम तरूणीची भूमिका केली होती. त्यानंतर दोन-तीन मालिकेत काम केलं. 'राम सिया के लव कुश' या मालिकेच्या आधी मी 'राधाकृष्ण' मालिकेत राधाची भूमिका केली होती. 

'राम सिया के लव कुश' या मालिकेत काम करण्याची संधी कशी मिळाली?
मी या मालिकेसाठी ऑडिशन दिलं नाही. या मालिकेच्या स्वस्तिक प्रॉडक्शनच्या 'राधाकृष्ण' मालिकेत मी काम केलं होतं. 'राधाकृष्ण' मालिकेतील काम आवडल्यामुळे त्यांनी मला सीतेच्या भूमिकेसाठी विचारलं आणि नाही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी लगेचच होकार दिला. कलर्स वाहिनी व निर्माते सिद्धार्थ तिवारी सरांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला सीतेची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यासाठी स्वतःला मी नशीबवान समजते. 

या भूमिकेसाठी तुझी निवड झाल्यावर तुझी व घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ?
मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की मला सीतेची भूमिका साकारायला मिळेल. पहिलं 'रामायण' आलं होतं त्यावेळी माझा जन्मदेखील झाला नव्हता. पण, मी बालपणापासून माझ्या वडिलांकडून ऐकत आले आहे की कधी कुणाला घाबरू नकोस. लोक तुझ्याबद्दल काय बोलताहेत किंवा विचार करत आहेत. कारण लोकांनी सीतेला देखील सोडलं नव्हतं. माझे संपूर्ण कुटुंब प्रभू रामचंद्र व सीता देवी यांची पूजा करतं. त्यामुळे जेव्हा मी सीतेची भूमिका करत असल्याचं घरी सांगितलं तेव्हा सगळं खूप खूश झाले होते. माझ्या माध्यमातून त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं त्यांना वाटतं. याआधीदेखील मी पौराणिक पात्र निभावले आहे, पण सीतेची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. अशाप्रकारची भूमिका साकारताना खूप जबाबदारी असते आणि मला आशा आहे की या भूमिकेतून प्रेक्षकांच्या अपेक्षांना मी खरी उतरेन.

या मालिकेचं वैशिष्ट्यं काय सांगशील?
या मालिकेतून सीता देवी व प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. तसेच राम व सीता यांच्यातील अतूट नातं रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. उत्तर रामायण आणि तेही लव कुश सांगताना दिसणार आहेत.

बॉलिवूडमध्ये काम करण्याचा काही विचार केला आहेस का? 
मी ज्या शहरातून आली आहे. तिकडचे कलाकार टिव्हीवर जरी दिसले तरी मोठी गोष्ट असते. मी आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करते आहे, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी टेलिव्हिजन, बॉलिवूड व डिजिटल असं प्रत्येक माध्यम मंदिर असून मी तिन्ही माध्यमांची पूजा करते. त्यामुळे मला भविष्यात या माध्यमात काम करण्याची संधी मिळेल. तेव्हा मी स्वीकारेन व मनापासून काम करेन.
 


Web Title: Shivya Pathania will be playing Seeta in ram siya ke luv kush
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.