उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट
By राकेश कदम | Updated: March 28, 2024 13:24 IST2024-03-28T13:23:18+5:302024-03-28T13:24:21+5:30
धैर्यशील माेहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येण्याच्या चर्चेला अखेर ब्रेक

उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट
राकेश कदम, साेलापूर: माढा लाेकसभा मतदारसंघातील माेहिते-पाटील विराेधक उत्तम जानकर यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केवळ माळशिरस तालुक्यातूनच नव्हे तर माढा मतदारसंघात भाजपसाठी काम करू. आम्ही भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबतच, असा शब्द उत्तम जानकर यांनी दिला.
लाेकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील घडामाेडींकडे सर्वांचे लक्ष आहे. माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विराेधात भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील माेहिते-पाटील बंडाच्या तयारीत आहेत. माेहिते-पाटील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असे त्यांचे काका जयसिंह माेहिते-पाटील यांनी कालच सांगून टाकले आहे. यादरम्यान, माेहिते-पाटील यांचे कट्टर विराेध उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर आणि माेहिते-पाटील एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली हाेती. मात्र जानकर यांनी महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर यांच्या मुंबईतील भेटीप्रसंगी माणचे आमदार जयकुमार गाेरे उपस्थित हाेते.