"मारकडवाडी गाव भाजपचं आहे अन् राहील"; राम सातपुतेंच्या इशाऱ्यानंतर जानकर म्हणाले, "ते डबडं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 12:49 IST2024-12-08T12:32:22+5:302024-12-08T12:49:21+5:30
मारकडवाडीत शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राम सातपुतेंनी उत्तमराव जानकरांवर निशाणा साधला.

"मारकडवाडी गाव भाजपचं आहे अन् राहील"; राम सातपुतेंच्या इशाऱ्यानंतर जानकर म्हणाले, "ते डबडं..."
Markadwadi : सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदानावरुन शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याच पार्श्वभूमीवर शरद पवार मारकडवाडीत पोहोचत ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, माळशिरचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील असा इशारा राम सातपुते यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत काही ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. उत्तमराव जानकर गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. पण ही मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला होता. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे मारकडवाडी ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले होते. त्यावरुनच भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांना इशारा दिला.
उत्तमराव जानकर यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवरील मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे गावात दोन गट पडले. त्यानंतर मारकडवाडीत शरद पवार दाखल झाले आहेत. यावरुनच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी एक्स पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. "रणजीत मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकरचे पाळीव गुंड मारकडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत. मारकडवाडी गाव भाजपाच आहे आणि राहील. दिवा विझायच्या आधी फडफड करत असतो," असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.
उत्तमराव जानकरांचे प्रत्युत्तर
"राम सातपुते हा खुळा माणूस आहे. मारकडवाडीत विकास काम केली आहेत. मग, मॉक पोलिंगला ते का घाबरत आहेत. मी कारखाना विकला असे, ते म्हणत आहेत. कारखाना व्यवस्थित चालू आहे. राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे डबडे आहे. ते वाजतच राहणार आहे,” असं प्रत्युत्तर उत्तमराव जानकरांनी दिलं.