Mohite-Patels prestige and the existence of Shinde brothers ..! | मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अन् शिंदे बंधूंचे अस्तित्व पणाला..!
मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अन् शिंदे बंधूंचे अस्तित्व पणाला..!

ठळक मुद्देमागील वीस पंचवीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदे व झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आलेसंजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून उमेदवारी स्वीकारताच शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मोहिते-पाटील अधिकच अस्वस्थ झाले होते.

डी. एस. गायकवाड

टेंभुर्णी : माढा तालुक्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात झालेली चुरशीची लढत वरकरणी पक्षीय वाटत असली तरी माढा तालुक्यात पुन्हा एकदा पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागात घड्याळाची टिकटिक वाढली असून, शहरी भागात कमळ उमलल्याची चर्चा आहे. माढा विधानसभा मतदारसंघात झालेले ६९.५२ टक्केमतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकंदरित ही निवडणूक मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर शिंदे बंधूंसाठी अस्तित्वाचीच ठरणार आहे.

संजय शिंदे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतल्याने भाजपच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागले. यामुळे त्यांनी संजय शिंदे यांना खिंडीत पकडण्याची रणनीती आखली होती. त्यानुसार माढा तालुक्यातील संजय शिंदे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करण्याची जबाबदारी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर सोपवण्यात आली होती.

राऊतांनीही ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या चाणक्य नीतीचा वापर करून माढा तालुक्यातील जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, वेंकटेश पाटील, संजय पाटील-भीमानगरकर, सुधीर महाडिक आदींची मोट बांधून मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांची भेट घालून संजय शिंदे यांना होमपिचवर घेरण्याची रणनीती आखली होती.

संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून उमेदवारी स्वीकारताच शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मोहिते-पाटील अधिकच अस्वस्थ झाले होते. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मोहिते-पाटील परिवाराने शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला माढा तालुका निवडणूक काळात पिंजून काढला. जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन सक्रिय केले होते व दबा धरून बसलेल्या संजय शिंदे विरोधकांना एकत्र केले होते.

अनेकांना वेगवेगळे शब्द देऊन भाजपच्या डेºयात दाखल केले. यानंतर भाजपमध्ये जाणाºयांची रांगच लागली होती. यामध्ये भारत पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, मोडनिंबचे बाबुराव सुर्वे, सापटण्याचे सागर ढवळे यांचा समावेश होता.
बघता बघता संजय शिंदे यांच्या विरोधात माढा तालुक्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, राजाभाऊ चवरे, संजय पाटील-भीमानगरकर, भारत पाटील, टेंभुर्णीतील कृष्णात बोबडे आदी सर्व मंडळी शिंदे विरोधात कामाला लागली होती.

माढा तालुक्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गटातटाचे राजकारण प्रभावी ठरल्याचे चित्र या निवडणुकीत पाहावयास मिळाले. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे हे पक्षीय राजकारणासाठी आग्रही दिसत होते तर बाकीचे शिलेदार मात्र तालुक्याबाहेरच्या गॉडफादरच्या मार्गदर्शनाखाली शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या भूमिकेतून गटातटाचे राजकारण करून आपला राजकीय हिशोब चुकता करण्यात गुंतले होते. भाजपमध्ये होणारी ही सर्व पळवापळवी व पळापळ होत असताना नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जनतेला मात्र गृहीत धरले होते. 

मागील वीस पंचवीस वर्षांपासून आमदार बबनराव शिंदे व झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आले होते. यामध्ये मोहिते-पाटलांपासून ते शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, शिवाजी कांबळे, संजय पाटील-भीमानगरकर, भारत पाटील, राजाभाऊ चवरे, जयंत पाटील, कृष्णात बोबडे, वेंकटेश पाटील ,बाबुराव सुर्वे, सुधीर महाडिक आदींचा समावेश होता.

दुसरीकडे संजय शिंदे यांनी बरोबर असणारी नेतेमंडळी व गावागावात असणारे कट्टर समर्थक व जनता यांच्या विश्वासावर आत्मविश्वासाने खिंड लढवली आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्यासह माजी आमदार विनायकराव पाटील, पंचवीस वर्षे साथ सोडलेले संजय पाटील-घाटणेकर, माजी उपसभापती बंडू ढवळे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, भाई शिवाजीराव पाटील, रमेश पाटील, रावसाहेब देशमुख, कैलास तोडकरी, दादासाहेब तरंगे, निशिगंधा माळी, उद्धव माळीआदी मंडळी खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय होते. आमदार बबनराव शिंदे यांचा तालुक्यातील गावागावात असणारा दांडगा संपर्क हे संजय शिंदे यांचे बलस्थान आहे. आमदार शिंदे यांनीही निवडणुकात बाहेरील तालुक्यात फारसे लक्ष न देता माढा तालुका पिंजून काढला. करमाळ््यातही उमेदवार संजय शिंदे यांच्याऐवजी यशवंत शिंदे व रश्मी बागल यांनीच प्रचार केला. आता निकालाकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.

सत्ता केंद्राचा ‘आधार’ कोणाला ?
- माढा तालुक्यातील टेंभुर्णी, बेंबळे, कुर्डू, मोडनिंब, भोसरे उपळाई मानेगाव हे सातही जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये कमी अधिक प्रमाणात शिंदे बंधूंचे वर्चस्व आहे. मागील पंचवीस वर्षांपासून माढा तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रे आमदार शिंदे यांच्या ताब्यात आहेत. या सर्व सत्ता केंद्राच्या माध्यमातून तालुक्यात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे हे संजय शिंदे यांचे या निवणुकीतील बलस्थान आहे. निष्ठावंत कार्यकर्ते, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गटाताटाभोवती फिरत राहिलेला प्रचार, आपला माणूस म्हणून घातलेली साथ, काही जातीय समीकरणे याचा फायदा शिंदे यांना होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

... तर सोलापूरच्या राजकारणावर परिणाम
- माढा लोकसभेच्या निकालानंतर कोणीही विजयी झाले तरी त्याचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. संजय शिंदे विजयी झाले तर जिल्ह्यात सत्तेचे केंद्र अर्थातच निमगावकडे सरकणार आहे तर रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय झाले तर पुन्हा अकलूज केंद्रस्थानी असणार आहे. ही निवडणूक भाजपच्या विशेष करून मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यासह शिंदे बंधूंच्या अस्तित्वाची ठरणार आहे.

सव्वादोन लाख मतदान
- माढा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार ६८२ एवढे मतदार असून यामध्ये १ लाख ७२ हजार ९३ पुरुष व १ लाख ५२ हजार ५८९ महिलांचा समावेश आहे. यापैकी २ लाख २५ हजार ७०८मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात ६९.५२ टक्के मतदान झाले.


Web Title: Mohite-Patels prestige and the existence of Shinde brothers ..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.