महाविकास आघाडीचं अखेर ठरलं; काँग्रेस ५० पेक्षा जास्त जागा लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:41 IST2025-12-25T09:39:31+5:302025-12-25T09:41:18+5:30
महापालिका निवडणूक; जागावाटपाचा तिढा समन्वयातून सुटला, कम्युनिस्टला दहा जागा

महाविकास आघाडीचं अखेर ठरलं; काँग्रेस ५० पेक्षा जास्त जागा लढणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : मागील काही दिवसांपासून जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाला ५० ते ५५, उद्धवसेनेला २७ ते २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १७ ते १८, तर कम्युनिष्ठ पक्षास ९ ते १० जागा देण्यास समन्वयातून ठरलं असल्याचेही सांगण्यात आले.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. भाजपविरोधातील सर्वच पक्ष एकत्रित आले आहेत. रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धवसेना, माकप पक्षातील नेते एकत्रित आले होते. पहिल्या बैठकीत प्रभागनिहाय उमेदवारांवर चर्चा झाली. कोणत्या जागा कोणत्या पक्षासाठी योग्य आहेत त्यावरही काहींनी मत व्यक्त केले. यावर सकारात्मक चर्चा झाली होती. या चर्चेतील माहिती बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इच्छुकांची संख्या जास्त; कोणाला संधी मिळणार?
पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. यात युवक-युवतींसह माजी महापौर, माजी नगरसेवक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, महिला यांसह अन्य विविध क्षेत्रांतील उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यातून आता कोणाकोणाला संधी मिळणार, हे पाहणे गरजेचे आहे.
असा आहे महाविकास आघाडीतील जागेचा फॉर्म्युला
काँग्रेस
५० ते ५५
राष्ट्रवादी (शरद पवार)
१७ ते १८
उद्धवसेना
२७ ते २८
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
९ ते १०
मुलाखती संपल्या.. आता याद्या होतील तयार
महाविकास आघाडीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या आहेत. काँग्रेस व उद्धवसेनेने मुलाखती घेत उमेदवारांची कामगिरी, जनसंपर्क व निवडून येण्याची क्षमता जाणून घेतली. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या अद्याप मुलाखती झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. मुलाखती झाल्या. आता अंतिम उमेदवारांची यादी तयार करण्यात पक्षाचे वरिष्ठ नेते कामाला लागल्याची सांगण्यात आले.
आम्ही तयार, युतीमध्ये भाजप आमदारांचा अडथळा जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंचा आरोप : आज बैठकीची शक्यता
महापालिकेत आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत. पण भाजप आमदारांमध्ये या विषयावर एकमत नाही. त्यामुळेच आम्ही एकट्याने लढण्याची तयारी करीत आहोत, असे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बुधवारी सांगितले.
शिंदे म्हणाले, आमच्या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम मागील आठवड्यात सोलापुरात होते. भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी त्यांची भेट घेतली. आ. विजयकुमार देशमुख युतीच्या बाजूने आहेत. आ. देवेंद्र कोठे युती करण्याच्या विरोधात आहेत. आ. सुभाष देशमुख यांची भूमिका तर कळत नाही. मग कोण ठरणार? संजय कदम यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुन्हा पक्षाची बैठक होईल. सध्या सर्व १०२ जागांवर तयारी करीत आहोत. पक्षाच्या बैठकीनंतर युतीबाबत चर्चा होईल. अन्यथा एकट्याने लढण्यावर ठाम राहू.
शिंदेसेना-अजितदादा गटाच्या युतीची चर्चा
भाजप नेत्यांनी रिपाइंला पाच जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे. मात्र शिंदेसेनेला सोबत घ्यायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन पक्षांची युती करण्याबाबत गुप्त बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपचा नाराज गट शिंदेसेनेच्या संपर्कात आहे. या सर्वांचे लक्ष भाजपच्या उमेदवार यादीकडे आहे.
महापालिकेत युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईतील वरिष्ठ नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी चर्चा होणार आहे. युतीबाबत सुयोग्य प्रस्ताव यायला हवा. समविचार पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहे. भाजप ताकतीने ही निवडणूक लढणार आहे.
जयकुमार गोरे, पालकमंत्री