शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:22 IST2024-12-07T09:16:28+5:302024-12-07T09:22:44+5:30
सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला.

शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सांगोला : सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख व शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला केला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर घडली. घटनेनंतर हल्लेखोर मिरज रेल्वे गेटच्या दिशेने पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर पाटील हे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या एमएच ४५ - एयू १९२९ या कारमधून मिरज रेल्वे गेटशेजारील शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी गाडी कार्यालयासमोर उभी करून कार्यालयात गेले. दरम्यान, अज्ञात २४ ते २५ वर्षीय तरुणाने त्यांच्या गाडीच्या पाठीमागील काचेवर दगडफेक करून मिरज रेल्वे गेटच्या दिशेने पळून गेला. काचेवर दगड मारल्यानंतर गाडीचा सायरन वाजू लागल्याने सागर पाटील यांनी बाहेर येऊन पाहिले असता एका महिलेने त्यांना एक मुलगा गाडीवर दगड फेकून पळून गेल्याचे सांगितले. सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला.
दरम्यान, सागर पाटील यांनी त्या तरुणाचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडे दिले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. या घटनेचा सांगोला शहर व तालुका शिंदेसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, या घटनेची चौकशी करून हल्लेखोराला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केली आहे.
शेकापने केली चौकशीची मागणी
"शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना निषेधार्ह आहे. अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नाही. या घटनेचा मी व्यक्तीशः निषेध करीत असून घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी," अशी मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली आहे.
शंभूराजेंनी केली शहाजीबापूंकडे विचारपूस
सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ल्याची माहिती मिळताच शिंदेसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी शहाजीबापू पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली. शिंदेंशी चर्चा करून योग्य ती कारवाई करायला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.