Rapido: रॅपिडो टॅक्सी चालकाची मुजोरी, फोनवर बोलू नको म्हणणाऱ्या प्रवाशावर लोखंडी रॉडने हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:15 IST2025-12-18T15:10:37+5:302025-12-18T15:15:51+5:30
Rapido Driver Attack Passenger: रॅपिडो चालकाने प्रवाशावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rapido: रॅपिडो टॅक्सी चालकाची मुजोरी, फोनवर बोलू नको म्हणणाऱ्या प्रवाशावर लोखंडी रॉडने हल्ला!
हरियाणातील फरिदाबादमध्ये रॅपिडो टॅक्सी चालकाने एका प्रवाशाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रॅपिडो सारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांच्या प्रवासी सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 'स्क्रोल' या प्रसिद्ध डिजिटल न्यूज पोर्टलचे राजकीय संपादक शोएब दानियाल यांनी प्रवासासाठी रॅपिडो टॅक्सी बुक केली. प्रवासादरम्यान चालक फोनवर बोलत होता. त्यामुळे दानियाल यांनी त्याला फोन ठेवून कार चालवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यामुळे चालक संतापला आणि त्याने कार थांबवून दानियाल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.
Rapido driver assault with rod.
— shoaib daniyal (@ShoaibDaniyal) December 17, 2025
Reason: I asked him to stop holding his phone to his ear in a call and put both hands on steering wheel. Before this he'd already nearly hit a motorcycle.
The real shocking thing is that no response from @rapidobikeapp for two days. It seems he… pic.twitter.com/1WKXDElgzz
शोएब दानियाल यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या 'एक्स' हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चालकाने कारमध्ये एक लोखंडी रॉड ठेवलेला स्पष्ट दिसत आहे. जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी चालकाला जाब विचारला, तेव्हा तो घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर रॅपिडो कंपनीच्या ड्रायव्हर व्हेरिफिकेशन प्रक्रियेवर जोरदार टीका होत आहे.
एकीकडे रॅपिडो, ओला आणि उबेर यांसारख्या कंपन्या डिजिटल इंडियाच्या नावाखाली सेवा देत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या चालकांचे गुन्हेगारी स्वरूप समोर येत आहे. फरिदाबादमधील या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी रॅपिडो कंपनी काय कारवाई करते आणि फरिदाबाद पोलीस या मुजोर चालकाचा शोध घेऊन त्याला कधी अटक करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रॅपिडोचे स्पष्टीकरण
रॅपिडो कंपनीने या घटनेबाबत अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. "फरिदाबादमध्ये एका प्रवाशावर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेबद्दल आम्हाला तीव्र खेद आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा, गैरवर्तन किंवा आक्रमक वर्तनाला रॅपिडो प्लॅटफॉर्मवर कोणतेही स्थान नाही. संबंधित चालकाला तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून, भविष्यात तो पुन्हा कधीही रॅपिडोसाठी काम करू शकणार नाही, याची खबरदारी घेत त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. आम्ही पीडित व्यक्तीच्या संपर्कात असून पोलिसांना त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत. रॅपिडोसाठी प्रवाशांची सुरक्षा हेच प्रथम प्राधान्य आहे," असे रॅपिडोने स्पष्ट केले आहे.