"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:41 IST2026-01-13T15:38:31+5:302026-01-13T15:41:02+5:30
मथुरेच्या जिल्हा रुग्णालयात नुकताच एक असा प्रकार घडला, जो पाहून डॉक्टरांचीही बोबडी वळाली!

"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
अनेकदा साप चावल्यावर लोक घाबरून जातात, पण मथुरेतील एका ई-रिक्षा चालकाने जे केले ते पाहून डॉक्टरही थक्क झाले. दीपक नावाच्या या चालकाला सापाने चावा घेतला, मात्र घाबरण्याऐवजी त्याने त्या जिवंत सापाला पकडून थेट आपल्या खिशात घातले आणि उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय गाठले. सापाला पाहून रुग्णालयात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली.
सोमवारी दीपक या ई-रिक्षा चालकाला एका सापाने दंश केला. विषारी सापाची ओळख पटवण्यासाठी आणि डॉक्टरांना उपचारांत मदत व्हावी, या उद्देशाने दीपकने त्या सापाला जिवंत पकडले. रुग्णालय गाठल्यानंतर त्याने डॉक्टरांसमोर खिशातून जिवंत साप बाहेर काढला. हातात साप घेतलेला रुग्ण पाहून आपत्कालीन कक्षातील डॉक्टर आणि इतर रुग्ण जीवाच्या आकांताने खुर्च्या सोडून पळाले.
डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणास्तव सापाला बाहेर काढण्याची विनंती केली, तेव्हा दीपक संतापला. "साप पाहिल्याशिवाय तुम्हाला विषाची तीव्रता कशी कळणार?" असा सवाल त्याने केला. डॉक्टरांनी नकार दिल्यावर त्याने निषेध म्हणून आपली ई-रिक्षा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी करून रस्ता अडवला. यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि तणाव वाढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. बराच वेळ समजावल्यानंतर दीपक शांत झाला. पोलिसांनी सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले, त्यानंतरच डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
"जिवंत सापासोबत उपचार करणे अशक्य आणि धोकादायक होते. यामुळे इतर रुग्णांच्या जीवाला धोका होता. सापाला बाहेर काढल्यानंतरच आम्ही उपचार सुरू केले", अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.दीपकवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र, या धाडसी आणि तितक्याच विचित्र प्रकाराची चर्चा संपूर्ण मथुरा जिल्ह्यात रंगली आहे.