Sindhudurg: राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा असणार योद्ध्याच्या वेशभूषेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:17 IST2025-02-17T12:16:03+5:302025-02-17T12:17:38+5:30

पायासाठी एम ५० हायग्रेड काँक्रीटचा वापर

There will be a statue of Chhatrapati Shivaji Maharaj in warrior attire in Rajkot | Sindhudurg: राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा असणार योद्ध्याच्या वेशभूषेत

Sindhudurg: राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा असणार योद्ध्याच्या वेशभूषेत

मालवण : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्य शासनाचा शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य स्वरूपात पुन्हा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल.

राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड कॉंक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

बांधकाम युद्ध पातळीवर सुरू

राजकोट मधील शिवपुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. रविवारी किणी यांनी सा. बां. विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांच्या समवेत याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून सावंतवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या कामाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला. 

९५ टन वजनाचा पुतळा उभारणार

या पुतळ्यात वापरण्यात येणाऱ्या ब्रान्झ धातूचे वजन ६० फुट असून स्टीलचे वजन ३५ टन असे एकूण ९५ टन वजनाचा हा पुतळा असेल. समुद्र किनारपट्टी वरील वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन पुतळ्याचे ऑस्ट्रेलियन कंपनी कडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी केली जाणार आहे. २०० किमी वेगाने प्रतितास वारे वाहिले तरीही पुतळ्याच्या कामाला बाधा निर्माण होणार नाही, याची चाचणी केली जाणार आहे. पुतळ्याचे आयुष्यमान १०० वर्षे असून देखभाल-दुरुस्तीचा कालावधी १० वर्षांचा असेल.

Web Title: There will be a statue of Chhatrapati Shivaji Maharaj in warrior attire in Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.