महायुतीत पेटली ठिणगी! नगरसेवकांच्या निलंबनावरून निलेश राणेंनी भाजपा जिल्हाध्यक्षाला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:32 IST2025-09-04T16:23:37+5:302025-09-04T16:32:59+5:30
सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना ...

महायुतीत पेटली ठिणगी! नगरसेवकांच्या निलंबनावरून निलेश राणेंनी भाजपा जिल्हाध्यक्षाला सुनावले
सिंधुदुर्ग: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव निर्माण झाला आहे. कुडाळ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत भाजपामधून निलंबित करण्यात आले. यावरुन शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी संतप्त होत भाजप जिल्हाध्यक्षांना खडेबोल सुनावले आहेत.
निलेश राणे यांनी याबाबत आपल्या एक्स हॅडेलवरुन ट्विट केले आहे. सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपाचे आठ नगरसेवक असून, या आठ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.
निलंबित का केलं?
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब हे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते सहकार्य करत नाहीत. भाजपच्या अधिकृत बैठका, सभा आणि कार्यक्रमांना वारंवार अनुपस्थित राहणे, इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करणे, वरील सर्व बाबी संदर्भात पक्षशिस्त पाळलेली नाही. त्यामुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने, पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले असल्याचं प्रभाकर सावंत यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.