Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:08 IST2025-10-04T18:07:38+5:302025-10-04T18:08:50+5:30
कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार

Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली
कुडाळ : अल्पवयीन युवती खून प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस, मांडशेतवाडी) याने खूनानंतर लपवून ठेवलेली खूनासाठी वापरलेली दोरी, दप्तर, मोबाइल, ओळखपत्र अशा तब्बल १६ वस्तू पोलिसांनी दोन दिवसांच्या शोध मोहीमे दरम्यान हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
संशयित आरोपी कुणाल कुंभारने एकतर्फी प्रेमातून हा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे. त्याने युवतीचा गळा दोरीने घालून मारल्यावर तिचा मृतदेह वाडोस येथील निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला होता. कुडाळ पोलिसांनी त्याला अटक करून सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
झुडपात लपवलेली सॅक आणि महत्त्वाचे पुरावे :
गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस आरोपीला वाडोस येथील श्री देव बाटमकर मंदिर (बाटमाचा चाळा) परिसरात घेऊन जाऊन तपास करण्यात आला. पोलिस, पंच आणि आरोपी या सर्वांच्या उपस्थितीत आरोपीने डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगराजवळील झुडपाजवळ लपवलेली चिखलाने माखलेली सॅक बाहेर काढली.
या सॅकमध्ये आढळून आलेल्या वस्तूंमध्ये:
- नायलॉन दोरी (७ फूट १ इंच लांब), युवतीचे ओळखपत्र, एसटी महामंडळाचा पास, मोबाइल सिमकार्ड, पैसे असलेली हँडपर्स, शालेय वस्तू (वही, पुस्तके, पेन्सिल, रबर), छत्री, हातरुमाल, थम्ब रिंग, लोखंडी कात्री, सॅनिटरी पॅड्स या वस्तू होत्या.
कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार
सुरुवातीला युवती आणि संशयित आरोपी कुणाल यांच्यात मैत्री होती. कुणालने तिला प्रपोज केल्यानंतर दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, पुढे आपल्या करिअरकडे लक्ष देऊ इच्छित असल्यामुळे तिने हे संबंध थांबविले. काही काळानंतर इतर मित्रांसोबत संवाद साधत असल्याचे समजताच कुणाल चिडला आणि त्यातूनच त्याने खून केला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कुडाळ पोलिसांनी आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैद्यक विभागाचे पथक लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.