Sindhudurg: संततधारेने कुडाळच्या भंगसाळ नदीला पूर, नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:03 IST2025-07-04T16:03:08+5:302025-07-04T16:03:34+5:30
अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

Sindhudurg: संततधारेने कुडाळच्या भंगसाळ नदीला पूर, नागरिकांचे स्थलांतर
कुडाळ : कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंगसाळ नदीला पूर आला असून, कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर तसेच इतर काही भागांमध्ये बुधवारी रात्री पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथील ५० ते ६० ग्रामस्थांना रात्रीच दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे लागले. काही घरांमध्ये पाणी घुसले असून, असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचे पाणी अनेक घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील दोन दिवस पावसाने पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यात मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे बुधवारी रात्री भंगसाळ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. काही घरांच्या पायरीपर्यंत पाणी आले होते. पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत राहिल्यास ही पूरस्थिती अधिक तीव्र होऊ शकते.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
तसेच तालुक्यातील कर्ली, निर्मला, बेल या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद
भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेलसमोरील शहरात येणारा मुख्य रस्ता तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता यावरही पाणी आले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद होती. बराच वेळ पाणी ओसरत नसल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती.
नागरिकांचे स्थलांतर
५० ते ६० नागरिकांना बुधवारी रात्री स्थलांतरीत करावे लागले. कारण बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी रात्री पावसाने जोर पकडल्याने भंगसाळ नदीला पूरस्थिती प्राप्त झाली होती. परिणामी कुडाळ आंबेडकरनगरमधील वस्तीला फटका बसण्याची शक्यता असल्याने काही नागरिकांचे रात्रीच स्थलांतर करण्यात आले.
नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बुधवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. परिणामी बहुतांश नद्यांना पूरस्थिती होती. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.