Sindhudurg: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:42 IST2025-03-03T16:41:43+5:302025-03-03T16:42:24+5:30
मालवण: येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून सुरवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चबुतऱ्यावर ...

Sindhudurg: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात
मालवण: येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून सुरवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चबुतऱ्यावर ज्या खडकावर छत्रपती उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग जोडण्याचे काम केले जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आज राजकोट किल्ला येथे शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुतळा उभारण्याच्या कामास कार्यारंभ आदेश ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला.
दरम्यानच्या काळात निवडणुका असल्याने ही जागा २५ डिसेंबर रोजी आमच्या ताब्यात देण्यात आली. जागा ताब्यात घेतल्यानंतर जो जुना चबुतरा होता तो तोडण्यात आला. दहा फूट खुदाई केल्यानंतर त्या ठिकाणी आढळलेल्या खडकामुळे आणखी दीड मीटरची खोदाई करावी लागली. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी चबुतऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले.
या चबुतऱ्यामध्ये ड्युपलेक्स नावाचे स्टील पिलर उभारण्यात आले आहे. मोठमोठ्या पुलांच्या कामांमध्ये या प्रकारचे स्टील वापरले जाते ते स्टील येथे वापरण्यात आले आहे. समुद्राची खारी हवा तसेच अन्य बाबींचा विचार करून ड्युपलेक्स स्टील वापरण्यात आले आहे. पुतळ्याच्या उभारण्यासाठी चांगल्या दर्जाचे ब्रांझ वापरण्यात आले आहे.
खडकाचे भाग बसवण्याच्या कामास सुरुवात
शिव पुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले पार्ट्स येण्यास सुरुवात झाली आहे. यात ज्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग बसवण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक आठवड्यात हे भाग येथे दाखल होतील.