सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

By नितीन काळेल | Published: May 8, 2024 07:01 PM2024-05-08T19:01:49+5:302024-05-08T19:02:46+5:30

तीन टक्क्यांनी वाढले मतदान; भाजप-राष्ट्रवादीत मंथन 

Udayanraje Bhosle or Shashikant Shinde will benefit from the increased voter turnout in Satara Lok Sabha Constituency | सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

सातारा : मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन् कोणाला हात देणार, याबाबत मंथन सुरू झाले आहे. तरीही भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हीच विजयी होण्याचा दावा ठोकला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे १९ लाख मतदार निवडणुकीसाठी पात्र होते. त्यातील ६३ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. तरीही अंतिम आकडेवारी आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांत जागृती केली. याचा परिणाम मतदान वाढीत झाला आहे. पण मतदानाची ही वाढती टक्केवारी काहींना डोकेदुखी ठरू शकते. याचे अनुमान आताच बांधणे अवघड असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत.

सातारा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब अजमावले. तरीही खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झालेली.

मतदान झाले असलेतरी मतमोजणीनंतरच वाढत्या मतदानाने कोणाला आधार दिला हे स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत विचारमंथन होत राहणार आहे. तरीही संपूर्ण मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, वाई, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांत मते मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. यासाठी ४ जूनचीच वाट पाहावी लागणार आहे.

पोटनिवडणुकीतील वाढीव मतदानाचा राष्ट्रवादीला फायदा..

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. त्यानंतर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक विधानसभेबरोबरच झाल्याने चुरस होती. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी ६७ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचे गणित होते.

३ टक्के मतदानाच करणार फैसला..

१९९१ पासून आतापर्यंत लोकसभेसाठी आठ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३ टक्क्यांवर मतदान झाले आहे. हे वाढीव ३ टक्के मतदानच मतदारसंघाचा फैसला करणार आहे.

Web Title: Udayanraje Bhosle or Shashikant Shinde will benefit from the increased voter turnout in Satara Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.