Satara: फलटणच्या मनोमिलनात नाराजीचा पडला खडा, अशोकराव जाधव यांच्या स्टेटसमुळे उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:35 IST2025-10-01T17:34:50+5:302025-10-01T17:35:11+5:30
वरवर पाहता शांत वाटणारे मनोमिलन चांगलेच हादरे देणार ठरु शकते

Satara: फलटणच्या मनोमिलनात नाराजीचा पडला खडा, अशोकराव जाधव यांच्या स्टेटसमुळे उडाली खळबळ
विकास शिंदे
फलटण : पितृपक्षांतर फलटणला राजकीय भूकंप या आशयाची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर फलटणच्या या कथित मनोमिलनाची चाचपणी बारामतीनेही केली. या मनोमिलनावर नाराज होऊन ? सलग सात वेळा फलटण पालिकेत नगरसेवक राहणारे माजी खासदार रणजितसिंह यांचे कट्टर निष्ठावंत समर्थक अशोकराव जाधव यांनी पहाटे पाच वाजता समाज माध्यमांवर स्टेटस ठेऊन खळबळ उडवून दिली. यामुळे वरवर पाहता शांत वाटणारे मनोमिलन चांगलेच हादरे देणार ठरु शकते, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
अशोकराव जाधव यांनी "लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून मी लवकरच भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असून या पुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही " असा संदेश सामाजिक माध्यमांवर स्टेटस म्हणून ठेवल्याने फलटणच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
मनोमिलन लांबणीवर ..
मनोमिलन होण्यासाठी अनेक राजकीय हालचाली फलटणच्या बाहेर सुरू होत्या यातच पितृपक्षांतर दिग्गज नेते पक्षांतर करणार असल्याचे वृत्तही होते परंतू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुबंई मध्ये आपली पॉवर दाखवल्याने कथित पक्षांतर लांबणीवर पडले असले तरी कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो .
वीर धरणावर काय ठरले ..?
काही दिवसांपूर्वी वीर धरणावरील रेस्ट हाऊस येथे दोन दिग्गज नेते मंडळींची त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांसह बैठक झाली ? या बैठकीत अनेक जुन्या गोष्टींवर चर्चा झाली असून पुढील वाटचाल कशी होणार यावर देखील चर्चा झाली परंतू फलटण येथील दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यांना ही गोपनीय भेट माहीत नाही यया भेटीत एकमेकांना पूरक गोष्टी ठरल्या गेल्या असल्याचे ही खास सूत्रांकडून समजले आहे परंतू अशी बैठक खरंच झाली की ही अफवा आहे याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
माझ्या वॉर्डातील विकास कामांबाबत काही मतभेद झाले होते, परंतु माजी खासदारांनी सकारात्मक निर्णय घेऊन सर्व गैरसमज दूर केले आहेत. यापुढे मी खासदार गट व भाजप पक्षासोबतच काम करणार आहे. - अशोकराव जाधव, माजी नगरसेवक