साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:44 IST2021-09-13T15:43:15+5:302021-09-13T15:44:13+5:30
पंचायत समितीमधील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला
सातारा : येथील सातारा पंचायत समितीमधील गणपतीसाठी लावण्यात आलेल्या डेकोरेशनला शाॅर्टर्किटमुळे आग लागली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
सातारा पंचायत समितीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास या डेकोरेशनला अचानक आग लागली. या आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली. हातात झुडपे घेऊन नागरिकांनी आगीच्या ज्वाळावर मारले. त्यामुळे आग विझली. मात्र, या आगीत डेकोरेशनचे साहित्य जळाले असून गणपतीच्या मूर्तीला या आगीची कोणतीही झळ बसली नाही. दरम्यान, पंचायत समितीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असून या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करायला हवी होती, असे मत आग विझवण्यासाठी आलेल्या फारूक पटणी यांनी व्यक्त केले.
पंचायत समितीची यंत्रणा कुठाय
पंचायत समितीमध्ये अग्नीशामक सीलेंडर आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस`थित होत आहे. हा सिलेंडर असता तर नागरिकांना झाडांची झुडपे घेऊन आग विझविण्याची वेळ आली नसती. आता तरी या घटनेतून पंचायत समितीने बोध घ्यावा. तसेच या गणेश मंडपाशेजारी एक कर्मचारीही नेमावा.