'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 09:22 AM2021-11-26T09:22:50+5:302021-11-26T09:29:15+5:30

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

Satara dcc bank election 2021, MLA Shashikant Shinde criticizes MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale | 'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

Next

सातारा: नुकतीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक (Satara District Bank Election) पार पडली. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे(MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी शिंदेंचा एक मताने पराभव केला. या पराभवावरुन आमदार शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे.

हे शिवेंद्रराजेंचे षडयंत्र आहे
निकालानंतर काल(गुरुवार) आमदार शिंदे माध्यमांसमोर आले आणि निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. 'आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच, ज्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा विरोध केला जात होता, मग त्यांना पॅनलमध्ये कसे घेतले, अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्याची जादूची कांडी फिरवली गेली आणि उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं ? असा सवाही त्यांनी केला.

...इतका दूधखुळा नाही
ते पुढे म्हणाले, एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकारण न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच आहे, असंही ते म्हणाले. 

जयंत पाटील काय म्हणाले ?
शशिकांत शिंदेंनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर पाटील म्हणाले की, शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे, त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचे म्हणने जाणून घेईन, असं मत जयंत पाटील म्हणाले. तसेच, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. 

निवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होती
सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण, त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार म्हणाले. तसिच, निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली, ही घटना खूपच दुर्दैवी आहे, असंही पवार म्हणाले.

 

Web Title: Satara dcc bank election 2021, MLA Shashikant Shinde criticizes MP Udayanraje Bhosale and Shivendraraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app