Satara: फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिंह एका व्यासपीठावर; रामराजे म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 19:49 IST2025-09-04T19:48:08+5:302025-09-04T19:49:34+5:30
आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही..

Satara: फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिंह एका व्यासपीठावर; रामराजे म्हणाले..
फलटण : ‘पत्रकारांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. रणजितसिंह व आमचे मतभेद आहेत. संघर्ष आहे, तुम्ही त्याला भांडण म्हणता. आमचे मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांची कॉलर पकडावी का? रणजितसिंह व मला आमच्या मर्यादा माहिती आहेत.
आम्ही कुठं थांबायचं हे त्यांनाही व मलाही चांगले माहिती आहे. त्याची काळजी कुणी करू नये, मतभेद आणि भांडण यात फरक आहे. मतभेद असल्याशिवाय लोकशाही जिवंत राहत नाही, संघर्षाला सात्त्विकतेची आणि माणुसकीची जोड मिळावी, संघर्षाचा केंद्रबिंदू मिळणारी पदे नसावीत’, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. रामराजे नाईक-निंबाळकर व माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. कोणतीही राजकीय सभा असो किंवा गावातील छोटा कार्यक्रम एकमेकांवर आरोप व टीका केल्याशिवाय कोणतीही सभा पूर्ण होत नाही. मात्र, बुधवारी फलटण येथे सत्कार समारंभानिमित्त थोडं वेगळं चित्र नागरिकांना पहायला मिळालं.
फलटणने दोन्ही नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर हजर असल्याने फलटणकरांनी मात्र भुवया उंचावल्या होत्या. पण दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याचे टाळल्याचे उपस्थितीतांनी आश्चर्य व्यक्त केले.
मी अध्यक्ष पदाचा वापर केला नाही..
पत्रकार अरविंद मेहता यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराजे होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. समाजशास्त्रात अध्यक्ष ठरवतो, कोणाला बोलायला द्यायचे आणि कोणाला नाही. आज मात्र मी त्याचा वापर केला नाही, असे रामराजे मिश्कीलपणे म्हणाले.