दुहेरीकरणाचे काम पूर्ण, साताऱ्यातील सुरक्षा तपासणीमुळे पुणे-मिरज रेल्वेमार्ग १४ तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:14 IST2025-11-07T15:13:21+5:302025-11-07T15:14:50+5:30
कोरेगाव-तारगाव रेल्वे मार्गाची तपासणी

छाया-जयदीप जाधव
सातारा/रहिमतपूर : पुणे-मिरजरेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्यात पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा तपासणी करण्यात आली. या कामासाठी १४ तासांचा मेगा ब्लाॅक घेतल्याने दिवसभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली हाेती. बऱ्याच प्रवाशांना याची माहिती नसल्याने त्यांना याचा फटका बसला़.
पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वे मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्याचे बऱ्याच दिवसांपासून सुरू हाेते.
अखेर गुरुवारी पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गाची सुरक्षा तपासणीला रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी इलेक्ट्रिक ट्रॉलीच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून अगदी बारकाईने या रेल्वे मार्गाची तपासणी केली. या सुरक्षा तपासणीमुळे या मार्गावर सकाळी दहा वाजल्यापासून १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेस व इतर गाड्या मिरजेतून पंढरपूर, दौंडमार्गे वळविण्यात आल्या.
आयुक्त मनोज अरोरा यांनी कोरेगाव ते तारगाव इलेक्ट्रिक ट्रॉलीतून प्रवास करताना जागोजागी थांबून रेल्वेमार्गाची तपासणी केली. त्यांच्यासोबत पाच इलेक्ट्रिक ट्रॉलीसह सुमारे ५० तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा ताफा होता. रात्री सात वाजेपर्यंत तपासणी सुरू होती. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आठ डब्यांची विशेष रेल्वे कोरेगाव ते तारगाव या २३ किलोमीटर मार्गावर प्रति तास ६० ते १०० किलोमीटर गतीने धावली. या रेल्वेमधून रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वत: प्रवास करत चाचपणी केली.
आता अधिकच्या गाड्या धावाव्यात
पुणे-मिरज या मार्गावर सध्या काेयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र , चालुक्य, गाेवा एक्स्प्रेस, काेल्हापूर-पुणे एक्स्प्रेस या गाड्या राेज धावत आहेत. आता पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावरून दिवसाला शंभरावर गाड्या धावण्याची क्षमता आहे. त्यामुळे या मार्गावर अधिकच्या गाड्या साेडल्या जाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून व्यक्त हाेत आहे.