Satara: शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलिस, कार्यकर्त्यांचे पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:32 IST2025-07-25T15:32:04+5:302025-07-25T15:32:36+5:30
२८ जुलैला पोलिस ठाण्यावर मोर्चा

Satara: शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलिस, कार्यकर्त्यांचे पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील निवासस्थानी चौकशीसाठी एक पोलिस गेले. मात्र, कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना, केवळ आमदार शिंदे यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे, असा दावा करीत संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षाचे कोरेगावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.
आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र साहिल शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, अरुण माने, ॲड. पी. सी. भोसले, हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सातारा येथील पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी केली.
कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी एका डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अक्षय सुरेश शिंदे हे कोणतीही परवानगी न घेता, बेकायदेशीरपणे शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हा संपूर्ण प्रकार बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे साहिल शिंदे यांनी सांगितले.
२८ जुलैला पोलिस ठाण्यावर मोर्चा
कोरेगाव पोलिसांकडून घडलेल्या प्रकाराबाबत आमदार शिंदे म्हणाले, पोलिस स्टेशन एखाद्या राजकीय पक्षाच्या इशाऱ्याप्रमाणे काम करत आहे. येत्या सोमवार (दि. २८) मी स्वतः कोरेगावात येणार आहे. पक्षाच्या वतीने कोरेगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.