Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:03 IST2025-01-25T12:03:14+5:302025-01-25T12:03:34+5:30

पादचाऱ्यांना ठोकरले; चालक ताब्यात

One killed four injured in speeding car collision in Wai satara | Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

वाई : वाई बसस्थानकासमोरील महाबळेश्वर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये एकजण ठार तर चाैघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. तर वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वाई बसस्थानकासमोर कार (एमएच,०४ जीई, ६६९५) भरधाव वेगात आली. या कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या काही पादचाऱ्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर कार त्याच वेगात पुढे गेली. यामुळे कारच्या धडकेत एक पादचारी ठार झाला. राजेंद्र बजरंग मोहिते ( रा. सोळशी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे.

तर अक्षय नामदेव कदम आणि अविनाश केळगणे (रा. वारोशी, ता. महाबळेश्वर) सीताराम धायगुडे (पूर्ण नाव नाही रा. वाई) आणि शिवांश जालिंदर शिंगटे (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना वाई आणि सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हसन बोरवी (रा. कोरची, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले आहे.

चालकाला चोप; तिघेजण गेले पळून..

हा अपघात झाला त्यावेळी पदचारी हे वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून घरी चालले होते. अपघात झाल्यानंतर वाई बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. तसेच अपघातानंतर नागरिक आणि आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी वाहन अडवून चालकाला चोप दिला. यावेळी कारमधील तिघेजण पळून गेले, अशी माहिती परिविक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांनी दिली. तर याप्रकरणी वाई ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण हे तपास करीत आहेत.

Web Title: One killed four injured in speeding car collision in Wai satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.