मस्साजोगची पुनरावृत्ती; फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:36 IST2025-06-14T13:34:43+5:302025-06-14T13:36:42+5:30

पाच संशयित फरार

Minor boy kidnapped and brutally beaten Massajog repeats in Phaltan taluka of Satara district | मस्साजोगची पुनरावृत्ती; फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण

मस्साजोगची पुनरावृत्ती; फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण

सातारा/लोणंद (जि.सातारा) : फलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली आहे. दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या प्रतीक प्रमोद रणवरे या अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले. त्यानंतर अमानुष मारहाण करून खुटे गावाजवळ सोडून त्याला दिले.

यानंतर पोलिसांनी रात्री अकरा वाजता त्याची सुटका केली. प्रतीकच्या पाठीवर मारहाणीचे वळ उठले असून, मुकामार लागल्याने त्यास बारामती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्रतीक रणवरे हा लोणंद येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. आयटीआय सुटल्यानंतर तो दररोज याच मार्गावरून मित्रासमवेत दुचाकीवरून घरी जात असे. हीच दिनचर्या लक्षात घेऊन अपहरणकर्त्यांनी पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता, प्रतीक आणि त्याचा मित्र नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जिंतीकडे निघाले होते. लोणंदपासून १०-१५ किलोमीटर अंतरावरील काळज-तडवळे फाटा परिसरात आले असता, गतिरोधकाजवळ त्यांच्या दुचाकीचा वेग मंदावला. 

त्याचा फायदा घेत दोन मोटारसायकलींवर आलेल्या पाच जणांनी गाडी आडवी मारून त्यांना अडविले. पाचही जणांनी तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. त्यांनी जबरदस्तीने प्रतीकला गाडीवरून खाली उतरवले व त्याच्या मित्राला तिथेच सोडून दिले. प्रतीकला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून अपहरण करून ते पसार झाले. खुटे गावच्या हद्दीत त्याला अपहरणकर्त्यांनी सोडून दिले. यानंतर रात्री ११ वाजता पोलिसांनी प्रतीकची सुटका केली. यावेळी त्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ होते.

पूर्वीच्या भांडणाची परिणीती

जिंती गावात एका सार्वजनिक कार्यक्रमात अपहृत प्रतीक आणि आरोपींमध्ये काहीसा वाद झाला होता. त्याच वादातून सूड घेण्याच्या उद्देशाने हे अपहरण केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Minor boy kidnapped and brutally beaten Massajog repeats in Phaltan taluka of Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.