Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:26 IST2025-09-29T18:25:02+5:302025-09-29T18:26:51+5:30
पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला

Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल
मिरज : मिरजेत गणेश तलाव येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निखिल विलास कलगुटगी (वय २६, रा. मिरज) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीनसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खूनप्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण (सर्व रा. मिरज) यांसह दोन अल्पवयीन व दोन अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद व प्रतीक चव्हाण हे चौघेजण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर अपहरण, खुनी हल्ला, बेकायदा हत्यार बाळगणे, असे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
तीन महिन्यांपूर्वी प्रथमेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी शहरात भरदिवसा ऋषिकेश कलगुटगी याचा भाऊ रोहन याच्यावर एका सलून दुकानात गोळीबार करून त्याचा खुनाचा प्रयत्न केला होता. रोहन त्या हल्ल्यातून बचावला होता. त्यावेळी ऋषिकेश याचा मामा निखिल कलगुटगी याने त्यास मदत केली होती. याचा रागातून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. शनिवारी रात्री १० वाजता गणेश तलावाजवळ निखिल कलगुटगी गेला होता. त्यावेळी गणेश तलावाजवळ तानाजी रस्त्याच्या फुटपाथ जवळ प्रथमेश ढेरे त्याच्या साथीदारांनी निखिल याच्यावर कोयता व अन्य हत्यारांनी अचानक हल्ला चढविता.
निखिल याच्या डोक्यात सपासप वार करून गंभीर जखमी केले. निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी निखिल यास उपचारासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्री निखिल याचा मृत्यू झाला. निखिल कलगुटगी हा एका राजकीय पक्षात पक्ष प्रवेश करणार होता. त्यापूर्वीच त्याच्या विरोधकांनी त्याचा काटा काढल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
तिघांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
निखिल कलगुटगी याच्या खुनात अन्य चार जणांचा सहभाग असून, त्यांच्यावरही कारवाईची मागणी करीत निखिल याच्या पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. चार जणांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. नातेवाइकांच्या तक्रारीची दखल घेऊन तपास करण्यात येईल, आणखी आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिले. त्यामुळे पाच तासांनंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.