कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
By घनशाम नवाथे | Updated: May 3, 2024 21:49 IST2024-05-03T21:48:18+5:302024-05-03T21:49:23+5:30
कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती. या खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आली होती. या खटल्याच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. परंतु, याचवेळी उज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे.

कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
सांगली : संपूर्ण देशभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा खटला चालवणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोथळे खून खटल्यात आता विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती होणार? याकडे लक्ष लागले आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये चोरीच्या संशयावरून अनिकेत कोथळे याला ताब्यात घेतली होते. त्याला पोलिस कोठडीत मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तत्कालीन उपनिरीक्षक युवराज कामटे व सहकाऱ्यांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळून पुरावा नष्ट केला. खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यांनी खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली. ‘सीआयडी’कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी तपास करून युवराज कामटे याच्यासह कर्मचाऱ्यांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती. या खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आली होती. या खटल्याच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. परंतु, याचवेळी उज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात २९ खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये सांगलीतील कोथळे खून खटल्याचा समावेश होता. आता त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे या खटल्यात पुढे काय होणार? याची उत्सुकता वाढली आहे. राज्य शासनाकडून आता या गाजलेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून खटल्यात विशेष सरकारी वकील नियुक्त न झाल्यास जिल्हा सरकारी वकिलांच्या पॅनलवरून वकिलांची नियुक्ती करावी लागेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
उज्वल निकम यांचा चौथा खटला-
सन १९९८ मध्ये सांगलीत झालेल्या अमृता देशपांडे खून खटल्यात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर मिरजेतील रितेश देवताळे खून खटल्यात दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. हिवरे येथील तिहेरी खून खटल्यात तिसऱ्यांदा, तर अनिकेत कोथळे खून खटल्यात चौथ्यांदा नियुक्ती झाली होती. यापूर्वीच्या तिन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.