सांगलीत पाण्याची उधळण, जतला थेंबासाठी वणवण; यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:30 IST2025-03-20T15:28:54+5:302025-03-20T15:30:41+5:30

Water Crisis News: मार्चनंतर टँकरची मागणी वाढणार

Water is being freely distributed in Sangli on Rang Panchami while water shortage continues in Jat taluka | सांगलीत पाण्याची उधळण, जतला थेंबासाठी वणवण; यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे

सांगलीत पाण्याची उधळण, जतला थेंबासाठी वणवण; यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे

विठ्ठल ऐनापुरे

जत : जत तालुक्यातील साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जत तालुक्यात पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवू लागली आहे. बहुतांशी गावांच्या पाणी योजना साठवण तलावावर अवलंबून आहेत. त्यामुळे मार्चनंतर जत तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एकीकडे जतमध्ये पाण्यासाठी वणवण सुरु असताना सांगलीत रंगपंचमीला पाण्याची मूक्त उधळण करण्यात आली.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली तरीही तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा मात्र झाला नाही. संखच्या मध्यम प्रकल्पासह नऊ तलावांतील पाणीसाठा तळाला गेला आहे. परिणामी, यंदाही पाणीटंचाई अटळ आहे. सोळा तलावांत म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने पश्चिम भागात मात्र सध्या टंचाई नाही. पूर्व भागात टंचाईचे सावट गडद होत आहे. जत पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने गेल्या दोन वर्षांपासून टंचाई जाणवत नाही. डफळापूर, मिरवाड या गावांना जानेवारीपासूनच टँकर द्यावा लागत होता. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे या गावांना टँकर बंद झाले आहेत.

तीस गावांत पाणीटंचाई

संख तलावावर अवलंबित वीस ते तीस गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. उमराणी, खोजानवाडी, गुगवाड, सिद्धनाथ, जातीहाळ, तिकोडी (क्र. एक), दरीबडची व अंकलगी त्यांनी तळ गाठला आहे. या भागात शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही. सद्यपरिस्थिती पाहता, मार्चनंतर जत पूर्व भागात टंचाई बाबत उपाययोजना कराव्या लागतील.

२६ हजार ५०० हेक्टर सिंचनाखाली येणार

विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांतील १ लाख ३ हजार ९२१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. त्यापैकी २६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या वर्षाखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून, योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या गावांना हवेत टँकर

जत पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. या पाण्यावर अवलंबित सिद्धनाथ, उमराणी, खोजानवाडी, गुगवाड, जालीहाळ, तिकोडी (क्र. एक), दरीबडची या गावांकडे लक्ष हवे. अंकलगी तलावाची परिस्थितीही वेगळी नाही. शिवाय, दरीबडची, माडग्याळ, जाडरबोवलाद, उमराणी, खोजानवाडी, मुचंडी, दरिकोनूर यांसह आजूबाजूच्या भागातून ही टँकरची मागणी होत आहे. दक्षिण भागातील बसरगी, गुगवाड, निगडी खुर्द या गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

Web Title: Water is being freely distributed in Sangli on Rang Panchami while water shortage continues in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.