Sangli Crime: शेत रस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून, मिरज तालुक्यात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:38 IST2023-03-24T15:35:52+5:302023-03-24T15:38:04+5:30
बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्तीत घडली घटना

Sangli Crime: शेत रस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून, मिरज तालुक्यात उडाली खळबळ
सदानंद औंधे
मिरज : बेळंकी ता.मिरज येथे शेतातील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या कारणातून डॉ. सुनिल आप्पासाहेब गायकवाड (वय ५०, रा. गायकवाड मळा, बेळंकी) यांच्यावर धारदार हत्यारांने वार करुन पुतण्याने खून केला. बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्ती, कॅनॉलजवळ काल, गुरुवारी (दि.२३) रात्री ही घटना घडली.
याप्रकरणी मृत सुनिल यांचा मुलगा सत्यजित सुनिल गायकवाड यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र सर्जेराव गायकवाड (२७) यास ताब्यात घेतले.
बेळंकीत गायकवाड मळा परिसरात पशुवैद्यकतज्ञ सुनिल गायकवाड व जितेंद्र गायकवाड या काका पुतण्यांची शेतजमीन आहे. जमीनीत ये-जा करण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या वादामुळे डॉ. गायकवाड यांनी हा रस्ता चार दिवसापूर्वी बंद केला होता. या रागातून जितेंद्रने चिडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. डोक्यात, तोंडावर व कपाळावर धारदार हत्यारांने वार केल्याने सुनिल गायकवाड यांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी डाॅ.सुनिल यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती. डॉ. गायकवाड यांचा खून करणारा पुतण्या जितेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. रस्त्याच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या घटनेमुळे बेळंकी परिसरात खळबळ उडाली होती.