Sangli: ट्रॅक्टर उलटून दोघे तरूण जागीच ठार, एक गंभीर जखमी; शर्यतीसाठी येताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:08 IST2025-10-10T17:07:59+5:302025-10-10T17:08:16+5:30
ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाचवले

Sangli: ट्रॅक्टर उलटून दोघे तरूण जागीच ठार, एक गंभीर जखमी; शर्यतीसाठी येताना झाला अपघात
जत : जत तालुक्यातील मुचंडी येथे गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मुचंडी-कोट्टलगी रस्त्यावर सकाळी सुमारे आठ वाजता चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे झाला. अभिषेक विनोद आरेकर (वय २२) आणि सलमान सिकंदर मुक्केरी (वय १९ रा. चिकट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर मुत्तू अशोक गौडर (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.
चिकट्टी (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील अभिषेक आरेकर, सलमान मुक्केरी व मुत्तू गौडर हे तीन तरुण मुचंडी येथे आयोजित केलेल्या शर्यतीसाठी गुरूवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन येत होते. मुचंडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घसरून अंदाजे १५ ते २० फूट खोल उलटा झाला. या भीषण अपघातात अभिषेक आणि सलमान या दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुत्तू गौडर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी मुत्तू याला बाहेर काढण्यात आले. मृत दोघांना बाहेर काढून पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पूर्णपणे चक्काचूर झाला असून, ट्रॅक्टरचे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. मृत दोघे खेळाडू वृत्तीचे होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने चिकट्टी व परिसरात शोककळा पसरली आहे. जत पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
शर्यतीसाठी येताना अपघात
मुचंडी येथील ट्रॅक्टर शर्यतीसाठी तिघेजण सकाळी येते होते. त्यावेळी अपघाताची दुर्घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी याची चर्चा सुरू होती.