Sangli Municipal Election 2026: सांगलीत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल; अवैध दारू, शस्त्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:04 IST2025-12-30T16:02:10+5:302025-12-30T16:04:06+5:30
प्रिंटिंग प्रेस मालकांना सूचना

Sangli Municipal Election 2026: सांगलीत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल; अवैध दारू, शस्त्र जप्त
सांगली : महापालिका निवडणुकीत आतापर्यंत विनापरवाना रॅली तसेच मालमत्ता विरूपण केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनाने अवैध दारूसाठा, शस्त्र बाळगल्याबद्दल कारवाई केली आहे. तसेच आतापर्यंत १५९ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे केली जात आहे. तरुण भारत स्टेडियममध्ये कार्यरत आचारसंहिता कक्षामध्ये आजअखेर एकूण ६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विनापरवाना दुचाकी रॅली काढणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विरूपण करणे या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित चार तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने कायदेशीर प्रक्रियेनंतर त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे यांनी आजअखेर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रशासनास सादर केला आहे.
वाचा : भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आजअखेर २७.६५ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २० हजार ९१५ इतकी आहे. कोयते बाळगून फिरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात एकूण १५९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अशा प्रकरणांत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा समर्थकाने आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कोणताही दबाव न ठेवता तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रिंटिंग प्रेस मालकांना सूचना
आचारसंहिता कक्षामार्फत शहरातील प्रिंटिंग प्रेस मालकांची बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार पोस्टर, बॅनर किंवा हँडबिलवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता बंधनकारक आहे. तरतुदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे
तक्रारीसाठी २४ x ७ सुविधा
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारीसाठी ०२३३-२९९१५०० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा तरुण भारत स्टेडियममधील आचारसंहिता कक्षास भेट देऊन तक्रार करता येईल. हा कक्ष २४ तास सुरू असेल.