Sangli Municipal Election 2026: महापालिकेसाठी उद्धवसेनेची तिसरी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:43 IST2025-12-31T14:41:43+5:302025-12-31T14:43:15+5:30
मनसे, राष्ट्रविकास आघाडी सोबतीला

Sangli Municipal Election 2026: महापालिकेसाठी उद्धवसेनेची तिसरी आघाडी
सांगली : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाशिवाय उद्धवसेनेने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी तिसरी आघाडी तयार केली आहे. या नव्या आघाडीमध्ये उद्धव सेनेला मनसे आणि राष्ट्रविकास आघाडीने साथ दिली आहे.
महापालिकेतील विविध प्रभागांमध्ये उद्धव सेनेसह मनसे आणि राष्ट्रविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २ (ब) मध्ये कासम मुल्ला, प्रभाग ३ मध्ये अर्चना पॉल, प्रभाग ४ मध्ये सुमित कांबळे, प्रभाग ५ मध्ये (ब) जैदाबी बारगीर, प्रभाग ६ मध्ये नुरजान जमादार, प्रभाग ७ मध्ये सोनाली कांबळे, प्रभाग ८ मध्ये अभिजीत कणिरे, प्रभाग ९ मध्ये हरिदास पडळकर, प्रभाग १० मध्ये अनिल शेटे, प्रभाग १२ मध्ये पूनम मयूर घोडके, प्रभाग १६ मध्ये उमर गवंडी, प्रभाग १९ मध्ये स्टेला गायकवाड आणि इतर महत्त्वाच्या प्रभागांमध्ये उमेदवारांनी आपली नावे नोंदवली आहेत.
उद्धवसेनेच्या या तिसऱ्या आघाडीमुळे महाविकास आघाडीची एकता ढासळल्याचे दिसून येत आहे. खासगी सूत्रांनी सांगितले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार पक्षाने आघाडीमध्ये उद्धवसेनेला सहभागी करुन घेतले नाही.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत ही तिसरी आघाडी कितपत यशस्वी ठरते, हे ओघाने पाहणे आवश्यक आहे. नव्या गठ्ठबंधनाची महापालिका निवडणुकीत परीक्षा होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विश्वासघात
राज्यपातळीवर महाविकास आघाडीत उद्धवसेना आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला मदत केली आहे. आता महापालिका निवडणुकीतही शेवटच्या क्षणापर्यंत जागा देणार असे सांगितले होते. पण, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकही जागा न देता केवळ आमचा प्रचार करा असे सांगून आमचा विश्वासघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे, असा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंह राजपूत यांनी केला आहे.