Sangli Municipal Election 2026: महापालिका रिंगणात उच्चशिक्षितांची संख्या कमी, काहींनी शिक्षणच लिहिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:32 IST2026-01-12T18:30:56+5:302026-01-12T18:32:52+5:30

उमेदवारांची शिक्षणानुसार वर्गीकरण.. वाचा सविस्तर

there are only 42 highly educated candidates In the Sangli municipal corporation elections | Sangli Municipal Election 2026: महापालिका रिंगणात उच्चशिक्षितांची संख्या कमी, काहींनी शिक्षणच लिहिले नाही

Sangli Municipal Election 2026: महापालिका रिंगणात उच्चशिक्षितांची संख्या कमी, काहींनी शिक्षणच लिहिले नाही

प्रसाद माळी

सांगली : निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. प्रचारादरम्यान अनेक उमेदवार सुशिक्षित असल्याचा उल्लेख करत मतदाराला आकर्षिक करत आहेत. या निमित्ताने महापालिका रिंगणात उभारलेल्या उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतला. यादरम्यान असे दिसले की ३८१ उमेदवार पैकी केवळ ४२ उमेदवार उच्चशिक्षित आहेत. त्यामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांचा समावेश आहे. तर पहिली ते १० पर्यंतचे शिक्षण झालेले तब्बल १७२ उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारराजा कोणाच्या पदरात आपल्या मताचे दान टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अनेक पक्षांनी चेहरे, आर्थिक निकष, वारसा असे पारंपरिक निवडून येण्याचे निकष लक्षात घेऊन जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. अनेक पक्षांनी शिक्षण हा मुद्दा महत्त्वाचा मानला नाही असे उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रातून लक्षात येते. पदवीधर, उच्च पदवीधर अशा उमेदवारांना तुलनेने कमी संधी मिळाली आहे. शहराच्या विकासाच्या तसेच भविष्यातील योजना आखण्याच्या दृष्टीने उच्चविद्याविभूषित लोकांची गरज असते. पण, असे निकषांकडे पक्षांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जे उच्चशिक्षित उमेदवार उभारले आहेत त्यामध्ये जास्त संख्याही अपक्षांची असल्याचे निदर्शनास आले आहे.

वाचा : भाजपचे ४२, शिंदेसेनेचे २० कोट्यधीश उमेदवार महापालिका रिंगणात; सर्वाधिक श्रीमंत कोण.. 

९२ जणांनी पदवीचे शिक्षण घेतले

निवडणुकीस उभारलेल्या मतदारांपैकी ९२ जणांनी विविध विद्यापीठांची पदवी प्राप्त केली आहे. पदवीधर आणि उच्चपदवीधर यांची संख्या जुळवल्यास हा आकडा १३४ इतका होताे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्यांची संख्या १७२ इतकी आहे. तर ११ वी ते पदवीच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ६९ इतकी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत पदवीधर निवडून न आल्यास महापालिकेत अल्पशिक्षितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

उच्चशिक्षितांची संख्या कमी

उच्चशिक्षितांना राजकारणात उतरून बदल घडवावा अशी अपेक्षा असते पण, प्रत्यक्षात तसे दिसत नाही. निवडणुकीत उभारलेल्या उच्चशिक्षितांमध्ये शिक्षक १०, डॉक्टर २, वकील ५, इंजिनिअर १२ व पीएडी मिळविलेल्या ३ जणांचा समावेश आहे. अशा या उच्चशिक्षितांना महापालिकेत जनता निवडून पाठवते का हे पाहावे लागेल.

शैक्षणिक पात्रता लिहिण्यात घेतला हात आखडता

अनेक उमेदवारांनी शिक्षणाच्या रकान्यात पूर्ण शिक्षण लिहिले गेले नाही. अनेकांनी केवळ १० वी १२ वी असे शिक्षण लिहून सोपस्कर पार पाडल्याचे दिसते. कारण काही बड्या नेत्यांच्या मुलांनीही उमेदवारी अर्ज भरताना शिक्षणाच्या रकान्यात जुजबी शिक्षण झाल्याचे नोंदवले आहे किंवा त्यांनी शिक्षण अपुरे ठेवले का, असा प्रश्न उपस्थित हाेतो.

उमेदवारांची शिक्षणानुसार वर्गीकरण

  • पदवीधर / ९२
  • उच्चशिक्षित / ४२
  • पहिली ते दहावी / १७२
  • ११ वी ते पदवीचे द्वितीय वर्ष / ६९
  • शिक्षण न झालेले किंवा नमूद न केलेले / ६

Web Title: there are only 42 highly educated candidates In the Sangli municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.