पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण नववर्षात; आतापर्यंत किती कोटी खर्च झाले... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:53 IST2024-12-25T15:52:49+5:302024-12-25T15:53:24+5:30

क्षमता मोठी, मात्र गाड्यांची वानवा

The work of doubling the 280 km railway line between Pune Miraj in nine years is still in the final stage | पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण नववर्षात; आतापर्यंत किती कोटी खर्च झाले... जाणून घ्या

संग्रहित छाया

मिरज : पुणे-मिरज दरम्यान २८० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नऊ वर्षांत अद्यापही अखेरच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र २०२४ संपत आले तरीही दुहेरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नवीन वर्षात मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

पुणे-मिरज दुहेरी मार्गावरून सध्या दिवसाला फक्त सहा एक्स्प्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. मध्य रेल्वेने पुणे-मिरज या २७९ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सन २०१६ मध्ये सुरू केले. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पासाठी चार हजार ८८२ कोटी रुपये खर्च मंजूर केला आहे.

पुण्याजवळ फुरसुंगीजवळ पूल बांधणीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने या तेथील दुहेरीकरणाच्या कामाला वेळ लागत आहे. सध्या या मार्गावरून दिवसाला फक्त सात एक्स्प्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने हजारो कोटी खर्च करून तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे.

पुणे ते मिरजदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांत दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. तयार झालेल्या सुमारे २४० किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू आहे.

मध्य रेल्वेने पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४ हजार ८०० कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे ते मिरजदरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होत आले आहे. मात्र, या मार्गावर गाड्यांची संख्याच खूपच कमी आहे. सध्या या मार्गावर कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, चालुक्य, गोवा एक्स्प्रेस, कोल्हापूर पुणे विशेष एक्स्प्रेस व पाच पॅसेंजर गाड्या दररोज धावतात. पुणे- हुबळी- पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचाही वेग वाढणार आहे.

धावणाऱ्या गाड्या

  • पुणे-मिरज मार्गावरून दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर - ९
  • पुणे-मिरज मार्गावरून आठवड्यातून एकदा धावणाऱ्या एक्स्प्रेस - ११
  • पुणे-मिरज मार्गावर आठवड्यातून दोन व तीन वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस - २६
  • पुणे-मिरज मार्गावरून एकूण धावणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर - २७.


पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरण झाल्याने या मार्गावरून दिवसाला शंभरावर गाड्या धावण्याची क्षमता आहे. मात्र, या मार्गावर खूपच कमी गाड्या धावतात. यामार्गे उत्तर भारतातही गाड्या जाऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या दुहेरी मार्गांवर गाड्या वाढवाव्यात. मालवाहतुकीसाठीही या भागातील रेल्वेस्थानकांचा विकास करावा. - सुकुमार पाटील, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

Web Title: The work of doubling the 280 km railway line between Pune Miraj in nine years is still in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.