सांगलीत महापालिकेत राजकीय यू टर्न; काल ज्यांनी पाडलं, आज तेच भाजपच्या विजयात पुढे...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:49 IST2026-02-05T18:47:38+5:302026-02-05T18:49:46+5:30
२०२१चा पराभव विसरून भाजप-राष्ट्रवादी एकत्र

सांगलीत महापालिकेत राजकीय यू टर्न; काल ज्यांनी पाडलं, आज तेच भाजपच्या विजयात पुढे...!
शीतल पाटील
सांगली : राजकारणात कालचे वैरी आजचे दोस्त कसे होतात, याचा प्रत्यय सांगली महापालिकेच्या सत्ताकारणातून पुन्हा एकदा येत आहे. सत्ता, संधी आणि समीकरणं बदलली की भूमिका कशा बदलतात, याचं हे उदाहरण ठरत आहे. २०२१ मध्ये महापौर-उपमहापौर निवडीत भाजपला धक्का बसला होता. पक्षातील सात नगरसेवकांच्या बंडामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार गजानन मगदूम यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची भूमिका बजावली होती. भाजपचा पराभव व्हावा यासाठी जे चेहरे तेव्हा आक्रमकपणे मैदानात उतरले होते, तेच चेहरे आज भाजपच्या विजयासाठी पुढे असल्याचे चित्र बुधवारी दिसत आहे. कालचा विरोध आज पाठिंब्यात बदलल्याने सांगलीच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.
तो महिनाही होता २०२१ मधील फेब्रुवारी... तारीख होती २३... महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. अडीच वर्षे सत्ताही भाजपची होती. भाजपचे ४१ अधिक दोन अपक्ष असे ४३ संख्याबळ. महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि गणितेच बदलू लागली. भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेससोबत नाराज भाजप नगरसेवकांना आपल्या गळाला लावून महापौर-उपमहापौर निवडीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
कोरोनामुळे ऑनलाइन मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक या भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी व उपमहापौरपदाचे उमेदवार काँग्रेसचे उमेश पाटील यांना मतदान केले. भाजपचे आनंदा देवमाने आणि शिवाजी दुर्वे गैरहजर राहिले. भाजपला धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांचा पराभव जिव्हारी लागला होता.
पाच वर्षांनंतर राजकीय चक्र पुन्हा फिरलं आहे. महापालिकेची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने वेगवेगळी लढली तरी सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजपने महापौरपदासाठी पुन्हा एकदा धीरज सूर्यवंशींवर विश्वास दाखवला, तर राष्ट्रवादीतून निवडून आलेले गजानन मगदूम उपमहापौरपदाचे उमेदवार केले. कालपर्यंत विरोधात रणशिंग फुंकणारी राष्ट्रवादी काँग्रेस आज भाजपसोबत युतीत सहभागी झाली.
२०२१ मधील भाजपचा गेम करणारे दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान ही मंडळी आता त्याच सूर्यवंशी व मगदूम यांच्या विजयासाठी पुढे होती. तर पराभवाला हातभार लावणारे दोन नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीतून निवडून आले. पण त्यांच्या पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनीही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध केली. काल भाजप पाडण्यासाठी एकत्र आलेले आज भाजपच्या विजयात पुढे झाल्याने सांगली महापालिकेचे राजकारण पुन्हा ‘यू-टर्न’मुळे चर्चेत आले आहे.