जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

By अविनाश कोळी | Published: April 25, 2024 04:53 PM2024-04-25T16:53:46+5:302024-04-25T16:55:46+5:30

महाविकास आघाडीत बिघाडी

The political equations have changed drastically in Sangli constituency this year | जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त; सांगलीत छुप्या तर कोणाच्या थेट खेळ्या

अविनाश कोळी

सांगली : लोकसभेच्या सांगली मतदारसंघात यंदा राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. प्रमुख तीन उमेदवारांत लढाई होत असली तरी पक्षीय स्तरावर काही नेते छुप्या राजकीय खेळात तर काहीजण उघडपणे कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत. जुने हिशेब चुकते करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त अनेक नेत्यांनी साधला आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेच्या वतीने चंद्रहार पाटील, भाजपतर्फे संजय पाटील, तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील उभे आहेत. त्यांच्याशिवाय अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांनीही शड्डू ठोकला आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर होताच, जिल्ह्यातील एकेका नेत्यांनी दबलेल्या रागाला वाट करून देण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारीवरून भाजप, काँग्रेस व उद्धवसेना अशा तिन्ही पक्षांमध्ये संशयकल्लोळ कायम आहे. उद्धवसेनेला ही जागा गेल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करतानाच त्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खेळी असल्याचा संशय व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी, उमेदवारीच्या प्रक्रियेशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तरीही अजून या विषयावर चर्चेला उधाण आलेले आहे. याशिवाय चांगले चिन्ह मिळू नये म्हणून एका नेत्याने राजकारण केल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. संबंधित नेत्याचे नाव लवकरच जाहीर करू, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद अद्याप शांत झालेला नाही.

सर्वच पक्षात संशयकल्लोळ 

विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे उद्धवसेना नाराज असून, त्या यामागेही कोणाचा तरी हात असावा, अशी शंका येत आहे. दोन्ही मित्रपक्ष असूनही त्यांचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. दुसरीकडे भाजपची उमेदवारी जाहीर होताच जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. ते थेट काँग्रेस उमेदवार विशाल पाटील यांचे समर्थन करीत आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही विशाल पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

उघड व छुप्या हालचाली

सांगली, मिरजेतील भाजपचे माजी नगरसेवक उघडपणे त्यांच्याच उमेदवाराविरोधात प्रचारात उतरले आहेत. आणखी काही भाजप नेते उमेदवारासोबतचा जुना हिशेब चुकता करण्यासाठी छुप्या राजकीय खेळ्या करू पहात आहेत. हाच प्रकार शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या गोटातही दिसून येत आहे.

वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न..

सांगली जिल्ह्यातील भाजपअंतर्गत छुप्या राजकीय खेळ्यांबाबतची कल्पना पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी सांगलीत आल्यानंतर संबंधित नाराज लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.

महाविकास आघाडीत बिघाडी

काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही नेते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत दिसत आहेत. प्रत्यक्षात कर्तव्य पालनाची औपचारिकता एकीकडे दाखविली जात असताना याच नेत्यांचे समर्थक बंडखोराच्या मांडवात दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय.

Web Title: The political equations have changed drastically in Sangli constituency this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.