Sangli Crime: इस्लामपुरातील मजूर महिलेच्या खुनाचे गूढ कायम, संशयिताची चलाखी बनली डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:02 IST2025-06-05T19:01:49+5:302025-06-05T19:02:18+5:30
गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Sangli Crime: इस्लामपुरातील मजूर महिलेच्या खुनाचे गूढ कायम, संशयिताची चलाखी बनली डोकेदुखी
इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या शिवनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या ६५ वर्षीय मजूर महिलेचा तोंडावर आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. कापूरवाडी रस्त्यावरील ओढ्याकडेला निर्जनस्थळी हा प्रकार घडल्याने सायंकाळी या घटनेला वाचा फुटली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हानिफाबी मदनसाब मुल्ला (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा दावल मदनसाब मुल्ला (वय ४१) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुनाचे कारण आणि संशयिताविषयी कोणतेही धागेदोरे लागत नसल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लागण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.
मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीसोबत हानिफाबी मुल्ला या गेल्या होत्या. त्यांचा मुलगा दावल हा सेंट्रिंग कामावर गेला होता. सायंकाळी परतल्यावर आई घरी नसल्याचे समजताच त्यांनी शोधाशोध करायला सुरूवात केली. त्याचवेळी कापूरवाडी रस्त्यावरील नरसोबा मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अत्यंत निर्जनस्थळी महिलेचा मृतदेह पडला होता. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तोंडावर आणि डोक्यावर कापीव जखमा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला.
इकडे आईचा शोध घेणारा मुलगा दावल मुल्ला याला ही घटना समजताच त्याने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे आईचा मृतदेह पाहताच त्याने हंबरडा फोडला. रात्री उशिरा हानिफाबी मुल्ला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
कष्टाळू महिला..
हानिफाबी मुल्ला या अत्यंत कष्टाळू होत्या. शेतमजूर म्हणून काम करून आल्यानंतरही दुसरे काम आल्यास त्या ते काम करत होत्या. परिसरातील सर्वांशी त्या मिळून मिसळून राहायच्या. परिसरातील कोणतेही काम करण्यास त्या नेहमी तयार असायच्या. त्यांच्या खुनाची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दागिन्यांची हौस..
हानिफाबी मुल्ला या कुटुंबासाठी खूप राबायच्या. त्यांचा मुलगा दावल हासुद्धा कष्टातून स्वत:चा सेंट्रिंग व्यवसाय उभारण्यापर्यंत यशस्वी झाला होता. तो आईला काम न करण्याबाबत सांगायचा. मात्र, हानिफाबी या कष्ट करायला मागे-पुढे पाहायच्या नाहीत. त्यांना दागिन्यांची मोठी हौस होती. त्यांच्या अंगावर भरभरून दागिने असायचे. त्याची परिसरात चर्चा होती.
पोलिसांनी तळ ठोकला
घटना घडल्यानंतर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह तळ ठोकला आहे. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून संशयिताचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. संशयितांचा माग काढण्यासाठी परिसरातील सी.सी.टी.व्ही. चित्रण तपासले जात आहे. निरीक्षक संजय हारूगडे व स्थानिक पोलिसही गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी झटत आहेत.