Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:02 IST2025-05-27T16:01:11+5:302025-05-27T16:02:29+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत

Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण
अशोक पाटील
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमने-सामने आले. जयंत पाटील यांनी विरोधी पक्षात असलेल्या जिल्हाध्यक्षांचा आवर्जुन केलेला सत्कार चर्चेचा विषय बनला आहे. जयंत पाटील यांच्या महायुतीत जाण्याच्या चर्चा यापूर्वीच सुरु झाल्या असल्याने हे त्याचे संकेत तर नाहीत ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेवरुन तर्कवितर्क सुरु आहेत. भाजपमध्ये प्रवेशाचा जयंत पाटील यांनी इन्कार करीत या पोकळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चेमुळे त्यांच्या सत्तेतील सहभागाचा विषय राजकीय गोटात चर्चेचा ठरला. जयंत पाटील यांचे विरोधक निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले गेल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.
जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची नुकतीच सातारा येथे भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत आला. आता वाळवा तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात जयंत पाटील व त्यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची भेट घेतली. त्यांना थांबवून जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. त्यामुळे आगामी काळात बदलणाऱ्या राजकीय समीकरणाचे हे संकेत मानले जात आहेत.
केवळ भाजप जिल्हाध्यक्षांचाच सत्कार
वाळवा तालुक्यात निशिकांत पाटील यांनी भाजप आणि आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद भूषविले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार तर उद्धवसेनेचे अध्यक्ष अभिजित पाटील आहेत. हे तिन्ही विरोधी पक्षातील जिल्हाध्यक्ष त्यांच्याच मतदारसंघातील आहेत. जयंत पाटील व या जिल्हाध्यक्षांची अनेकदा खासगी कार्यक्रमात भेटही झाली. मात्र, त्यांनी कोणाचाही सत्कार केला नाही. केवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष महाडिक यांचाच सत्कार केल्याने यावरुन त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्क लढविले जात आहेत.