Sangli Municipal Election 2026: बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश, काँग्रेसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:08 IST2026-01-03T17:07:18+5:302026-01-03T17:08:00+5:30
नेत्यांकडून मनधरणी यशस्वी : प्रभाग १४ मध्ये थेट मुख्यमंत्री यांचीच मध्यस्ती

Sangli Municipal Election 2026: बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश, काँग्रेसला धक्का
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या दिवसभर मनधरणीमुळे अनेक निष्ठावान उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिंदेसेना, उद्धवसेना पक्षांमुळे बहुतांश प्रभागांत बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ३०१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणुकीत राहिले आहेत.
सांगलीत प्रभाग १४ मध्ये भाजपमध्येच हायहोल्टेज लढत होणार असल्याची चर्चा होती, तेव्हा शिवप्रतिष्ठानचे राहुल बोळाज यांनी उमेदवारी अखेर मागे घेतली. यासाठी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. चर्चेत भाजपाविरोधात असणारी उमेदवारी मागे घेण्यात आली.
महापालिका निवडणुकीत भाजप यंदा ७८ जागांवर स्वबळावर लढत आहे. शिंदेसेनेने ६५, काँग्रेसने ३२, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३३ जागांवर तर उद्धवसेना-मनसे-राष्ट्र विकास सेना यांच्या तिसऱ्या आघाडीतर्फे ३१ जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजप नेत्यांनी अनेक नाराजी असलेल्यांची समजूत काढण्यात यश संपादन केले आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नेत्यांना धक्का बसला आहे.
वाचा : कुपवाडमध्ये तिन्ही प्रभागांतून चौरंगी लढतीचे संकेत, ५२ उमेदवारांनी घेतली माघार
भाजपने काही प्रमुख उमेदवारांना थांबविले, जसे की महापालिकेतील माजी सभागृह नेते विनायक सिंहासने, माजी नगरसेविका अप्सरा वायंदडे, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, विश्वजीत पाटील, प्रियांका बंडगर, दीपक माने आणि इतर नाराजी असलेले. आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते शेखर इनामदार, नीता केळकर यांच्या सहाय्याने अनेक भाजप नेत्यांनी बंडखोरांशी संवाद साधून उमेदवारी मागे घ्यायला लावली.
महापालिकेच्या एकूण १७ प्रभागांत तिरंगी, १६ प्रभागांत चौरंगी तर एका प्रभागात दुरंगी लढत होत आहे. उर्वरित ४४ जागांवर बहुरंगी लढतीचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढत असली तरी, त्यांच्या उमेदवार असलेल्या प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवार दिले नाहीत. बहुतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकरांनी छुपा समझोता केला आहे.
मिरजेत भाजपविरोधी आघाडीचे गणित बिघडले
मिरजेत मागील निवडणुकीत भाजपच्या विजयी झालेल्या प्रभाग सातमधून गायत्री कल्लोळी यांना भाजपने डावलल्याने, त्यांनी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी मागे घेतली. आनंदा देवमाने यांनी शुभांगी देवमाने यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली होती, त्यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या प्रभागातील भाजपविरोधी आघाडीचे गणित बिघडले आहे.
सांगलीवाडीत एकास एक लढतीची रणनीती
सांगली वाडीतील प्रभाग १३ मध्ये भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजप विरोधात एकास एक लढत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रवादीने अभिजीत कोळी यांचा अर्ज कायम ठेवला, तर हर्षदा हरिदास पाटील व अपर्णा कदम यांचे अर्ज माघार घेण्यात आले. तर काँग्रेसकडून दीपाली दिलीप पाटील व अश्विनी कदम रिंगणात आहेत. या पॅनलची थेट लढत आता भाजपच्या उमेदवारांशी होणार आहे.
सर्व पक्षांकडून ४८ माजी नगरसेवक मैदानात
महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांकडून ४८ माजी नगरसेवक मैदानात उतरले होते. भाजपकडून २१, राष्ट्रवादी काँग्रेस १०, काँग्रेसकडून ७, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ६, शिंदेसेना २ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दोन माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळाली आहे.
प्रभागनिहाय रिंगणातील उमेदवार संख्या
प्रभाग १ गट (अ) ७, गट (ब) ४, गट (क) ६, गट (ड) ४,
प्रभाग २ गट (अ) ३, गट (ब) ५, गट (क) ४, गट (ड) ४,
प्रभाग ३ गट (अ) ५, गट (ब) ३, गट (क) ५, गट (ड) ८,
प्रभाग ४ गट (अ) ४, गट (ब) ४, गट (क) ८, गट (ड) ३,
प्रभाग ५ गट (अ) ६, गट (ब) ६, गट (क) ७, गट (ड) ८,
प्रभाग ६ गट (अ) ५, गट (ब) ५, गट (क) ५, गट (ड) ६,
प्रभाग ७ गट (अ) ३, गट (ब) ८, गट (क) ३, गट (ड) ८,
प्रभाग ८ गट (अ) ९, गट (ब) ५, गट (क) ६, गट (ड),
प्रभाग ९ गट (अ) ५, गट (ब) ५, गट (क) ३, गट (ड) ७,
प्रभाग १० गट (अ) ५, गट (ब) ४, गट (क) ४, गट (ड),
प्रभाग ११ गट (अ) ४, गट (ब) ३, गट (क) ३, गट (ड) २,
प्रभाग १२ (अ) ५, गट (ब) ५, गट (क) ४, गट (ड) ३,
प्रभाग १३ गट (अ) ३, गट (ब) ३, गट (क) ४,
प्रभाग १४ गट (अ) ४, गट (ब) ३, गट (क) ३, गट (ड) ५,
प्रभाग १५ गट (अ) ३, गट (ब) ४, गट (क) १०, गट (ड) ५,
प्रभाग १६ गट (अ) ६, गट (ब) २, गट (क) ५, गट (ड) ६,
प्रभाग १७ गट (अ) ४, गट (ब) ५, गट (क) ३, गट (ड) ५,
प्रभाग १८गट (अ) ६, गट (ब) ४, गट (क) ३, गट (ड) ३,
प्रभाग १९ गट (अ) ५, गट (ब) ६, गट (क) ४, गट (ड) ६,
प्रभाग २० गट (अ) ६, गट (ब) ६, गट (क) ६ उमेदवार रिंगणात आहेत.