Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २३, काँग्रेसकडून १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी; सत्ताधाऱ्यांचा १८ जणांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:49 IST2026-01-01T18:48:47+5:302026-01-01T18:49:27+5:30
आठजण महाआघाडीच्या गळाला

Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २३, काँग्रेसकडून १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी; सत्ताधाऱ्यांचा १८ जणांना धक्का
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, उद्धवसेना-मनसे युती अशी पंचरंगी लढती होत आहे. सर्वच पक्षांनी मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार यादी जाहीर केली. यात भाजपकडून २३ माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. तर १८ माजी नगरसेवकांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यापैकी आठजण महाआघाडीच्या गळाला लागले. काँग्रेसने १५, राष्ट्रवादीने (अजित पवार) १३, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने ९ जणांना उमेदवारी दिली आहे. काही ठिकाणी माजी नगरसेवकांच्या घरात सून, मुलगी, पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या ७८ जागांसाठी १०६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात गत सभागृहातील सदस्यांसह माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. भाजपकडे उमेदवारीसाठी मोठी मागणी होती. गत सभागृहात भाजपचे ४१, काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १५ व दोन अपक्ष सदस्य होते. त्यापैकी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत ६ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीतील तीन ते चार जण भाजपात गेल्याने पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या ५० पर्यंत पोहोचली होती. त्यापैकी केवळ २३ माजी नगरसेवकांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
काही ठिकाणी आरक्षणामुळे माजी नगरसेवकांच्या घरातील पत्नी, मुलगी, सून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दहा ते बारा जणांना मात्र उमेदवारीच नाकारण्यात आली. त्यापैकी आठजण महाआघाडीच्या, तिघे राष्ट्रवादी (अजित पवार) तर एकजण शिंदेसेनेकडून रिंगणात उतरले आहेत.
भाजपच्या माजी नगरसेविका अनारकली कुरणे, अपर्णा कदम, आशा शिंदे, सुरेश बंडगर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या पत्नी माजी नगरसेविका शुभांगी देवमाने, माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी, शेवंता वाघमारे, विक्रम सावर्डेकर यांच्या पत्नी सोनल पाटील, विलास सर्जे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली.
भाजपच्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीने घेतला. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आठ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामध्ये रईसा रंगरेज, संजय मेंढे, बबिता मेंढे, गायत्री कल्लोळी, वर्षा निंबाळकर, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, मयूर पाटील यांचा समावेश आहे. तर यापूर्वीच्या सभागृहातील कांचन भंडारे, राजेश नाईक, प्रमोद सूर्यवंशी, शेवंता वाघमारे, विशाल कलकुटगी, अय्याज नायकवडी या माजी नगरसेवकांनाही उमेदवारी दिली आहे.
तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने माजी नगरसेवक शेडजी मोहिते, सविता मोहिते, मनगू सरगर, अनारकली कुरणे व अपर्णा कदम यांना उमेदवारी दिली. तर यापूर्वी काम केलेल्या माजी नगरसेविका आशा शिंदे व माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
मदनभाऊ गटाच्या सहा जणांना भाजपची उमेदवारी
काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सहा नगरसेवकांनीही प्रवेश केला. त्या संतोष पाटील, रोहिणी पाटील, प्रकाश मुळके, पद्मश्री पाटील, उत्तम साखळकर, संजय कांबळे या सहा जणांना भाजपने उमेदवारी दिली. याशिवाय खासदार विशाल पाटील गटातून भाजपात आलेल्या मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, राष्ट्रवादीतून आलेल्या योगेंद्र थोरात यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास टाकला आहे.