Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:35 IST2025-10-08T13:34:53+5:302025-10-08T13:35:01+5:30
पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा
मिरज (जि. सांगली) : मिरज शास्त्री चौक परिसरात दोन गटांतील भांडणामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केल्याने पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती.
मंगळवारी रात्री शास्त्री चौकात एका तरुणाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद पेटला. यामुळे मोठा जमाव जमला. संबंधित तरुणाच्या घरावर जमाव चाल करून गेला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने शास्त्री चौकात पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. यानंतर तरुणांचा जमाव पोलिसांसमोर आला. पोलिस ठाण्याकडे जाताना शास्त्री चौक, हायस्कूल रस्ता व मार्केट परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली.
दंगा झाल्याची अफवा पसरल्याने पूर्ण शहर बंद झाले. रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. अपमानास्पद शिवीगाळ करणाऱ्या संबंधित तरुणावर कारवाईसाठी पोलिस ठाण्यासमोर जमाव आक्रमक झाला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने मिरजेत भेट दिली.
मुख्यालयातील मोठा पोलिस फोर्स मिरजेत तैनात करण्यात आला. पोलिसांनी तरुणावर कारवाईचे आश्वासन देत तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते.
डिजिटल फलक फाडला
जमावाने शास्त्री चौकात संशयित तरुणाचे छायाचित्र असलेला डिजिटल फलक फाडून नासधूस केली. पोलिसांची जादा कुमक आल्यानंतराही काही काळ जमाव चौकात होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
पोलिसांनी रात्री उशिरा एका तरुणावर गुन्हा दाखल केला. पोलिसप्रमुखांनी या प्रकरणी चौकशीचे व कारवाईचे आश्वासन दिले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मिरजेतील प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.