Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:06 IST2025-05-13T18:05:54+5:302025-05-13T18:06:56+5:30
विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार?

Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था
अशोक पाटील
इस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात शह देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राजकीय खेळ्या सुरु होत्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेने येथील स्थानिक खेळ्यांना धक्का बसला असून टोकाचा संघर्ष करणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्त्यांत या चर्चेने संभ्रम व अस्वस्थता दिसून येत आहे.
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होण्यासाठी नवीन डाव टाकला आहे. याचे अधिकार खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशा चर्चेने जोर धरला असतानाच जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तास्थानी ते जातील अन् मतदारसंघ व जिल्ह्यातील दोर पुन्हा त्यांच्या हाती येतील का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीचे मिलन होणार नाही, असा तर्क काहीजण लावत आहेत, तर दोन राष्ट्रवादीमधील वाद संपल्यानंतरच आमदार जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळू शकते, अशीही चर्चा त्यांच्या समर्थकांत दिसून येत आहे. मात्र, जयंत पाटील यांच्या ताकदीला आव्हान देत राजकीय खेळ्या करणाऱ्या विरोधकांच्या प्रयत्नाला अचानक या चर्चेने ब्रेक मिळाला आहे.
विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार?
आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढविलेले निशिकांत पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील यांच्यासह नुकतेच अजित पवार गटात आलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भूमिका काय असेल, याबाबतही तर्कवितर्क सुरु आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो आम्ही मानू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून आहे. याबाबत आपणास काहीही माहीत नाही. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष