Sangli: 'रिल्स'च्या नादात मिरजेत वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:36 IST2025-08-05T15:36:03+5:302025-08-05T15:36:29+5:30
मिरज (जि. सांगली ) : रिल्स बनवण्याच्या नादात पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना ...

Sangli: 'रिल्स'च्या नादात मिरजेत वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
मिरज (जि. सांगली) : रिल्स बनवण्याच्या नादात पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून काचा फोडणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना मिरजेतरेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी पुण्यातून हुबळीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस मिरजेतून सुटल्यानंतर आऊटर सिग्नल बाहेर गाडीवर दगडफेक झाल्याने ‘सी वन’ बोगीच्या खिडकीची काच फुटली. गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत हुबळी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वंदे भारतच्या बोगीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मिरजेत तीन अल्पवयीन मुले रेल्वे मार्गालगत बसलेली असून, त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचे दिसले. हुबळी नियंत्रण कक्षाने हे सीसीटीव्ही फुटेज मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे पाठवले.
धावत्या रेल्वेतील कॅमेऱ्यातून चित्रित झालेले दगडफेकीचे ठिकाण मिरजेतील म्हैसाळ रोड परिसरात असल्याचे दिसून आले. मात्र, दगडफेक करणाऱ्या मुलांचे चेहरे ओळखता येत नव्हते. रेल्वे सुरक्षा दलाने म्हैसाळ रोड परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या वसाहतींत शोध घेऊन दगडफेक करणाऱ्या मुलांना शोधून काढले.
तिघेही अल्पवयीन असून, मोबाईलवर रिल्स बनवण्यासाठी ते रेल्वे मार्गावर गेले होते. यावेळी आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर गंमत म्हणून दगडफेक केल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी मिरज रेल्वे सुरक्षा दलाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.