खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:19 IST2022-06-20T14:52:26+5:302022-06-20T16:19:41+5:30

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने मिरज तालुका हादरला

Shocking! Nine members of the same family commit suicide in Sangli | खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष घेऊन आत्महत्या

खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष घेऊन आत्महत्या

सांगली/म्हैसाळ - मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याचा का घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या बंगल्यावर तीन मृतदेह मिळून आले आहेत.  त्या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह हजर राहण्यास आहेत. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. 

याबाबत येथील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Read in English

Web Title: Shocking! Nine members of the same family commit suicide in Sangli